मुक्तीधामजवळ पहाटे बिबट्या दिसला; वनविभागाच्या पाहणीनंतर अखेर अफवेला पूर्णविराम
मुक्तीधामजवळ पहाटे बिबट्या दिसला; वनविभागाच्या पाहणीनंतर अखेर अफवेला पूर्णविराम
img
Chandrakant Barve

नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी):- पहाटेची वेळ... परिसर नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकांनी गजबजलेला... आणि अचानक मुक्तीधाम मंदिराशेजारील जलकुंभाजवळ बिबट्या दिसल्याची बातमी पोलिसांपर्यंत धडकली. क्षणातच ही माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरली आणि नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. नेमका बिबट्या कुठे आहे? तो अजूनही परिसरातच आहे का? या चर्चांना उधाण आले.

मुक्तीधाम मंदिर व परिसर पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत गजबजलेला असतो. परिसरात मोठी लोकवस्ती असून अनेक उच्चभ्रू नागरिक येथे वास्तव्यास आहेत. तसेच जवळच असलेल्या मनपा शाळेच्या मैदानावर पहाटेपासून महिला व नागरिक मॉर्निंग वॉकसाठी येतात, तर करिअर अकॅडमीचे विद्यार्थीही या परिसरात सराव करीत असतात. त्यामुळे बिबट्या दिसल्याची माहिती मिळताच नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला.

बुधवारी पहाटेच्या सुमारास मुक्तीधाम मंदिराशेजारील पाण्याच्या जलकुंभाजवळ बिबट्या दिसल्याचा फोन पोलिसांना आला. पोलिसांनी तत्काळ वनविभागाला माहिती दिली. त्यानंतर वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक लोकप्रतिनिधींनीही नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने घटनास्थळी धाव घेतली.

वन अधिकारी सुमित निर्मल यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाच्या पथकाने जलकुंभ परिसरासह आजूबाजूच्या भागाची बारकाईने पाहणी केली. संभाव्य ठिकाणी बिबट्याच्या हालचालींच्या खुणा, ठसे किंवा अन्य कोणतेही पुरावे आढळतात का, याचा शोध घेण्यात आला. मात्र, बराच वेळ पाहणी करूनही बिबट्याच्या अस्तित्वाचा कोणताही ठोस पुरावा वनविभागाच्या हाती लागला नाही.

अखेर वनविभागाने बिबट्या दिसल्याची माहिती ही निव्वळ अफवा असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे काही काळ भीतीच्या छायेत असलेल्या नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला. मात्र, गजबजलेल्या मानवी वस्तीत बिबट्या दिसल्याची अफवाची चर्चा सुरूच आहे.
इतर बातम्या
उद्या

गंगापूर धरण

Join Whatsapp Group