बहिणीच्या घरचा पिंजरा चुकवून भावाच्या आसऱ्याला बिबट्या? चाडेगावनंतर चेहडी बु.मध्ये पिंजऱ्यातील कुत्र्यावर हल्ल्याचा प्रयत्न
बहिणीच्या घरचा पिंजरा चुकवून भावाच्या आसऱ्याला बिबट्या? चाडेगावनंतर चेहडी बु.मध्ये पिंजऱ्यातील कुत्र्यावर हल्ल्याचा प्रयत्न
img
Chandrakant Barve

नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी):- बहिणीच्या घराजवळ लावलेल्या पिंजऱ्याला चकवा देत बिबट्या थेट भावाच्या शेतमळ्यातील बंगल्याच्या आसऱ्याला आला आणि पिंजऱ्यातील कुत्र्याला लक्ष्य केले का? अशी चर्चा चेहडी बु. परिसरातील नागरिकांमध्ये सुरु आहे. चेहडी बु. येथील शेतकरी शिवाजीराव म्हस्के यांच्या शेतमळ्यात शनिवारी मध्यरात्री बिबट्याने पिंजऱ्यात बंद असलेल्या कुत्र्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. बिबट्याच्या या हालचाली सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.

शनिवारी सायंकाळी शिवाजीराव म्हस्के यांचे बंधू शामराव म्हस्के हे पत्नी, मुलासोबत कौटुंबिक कार्यक्रमासाठी बाहेर गेले होते. रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास ते घरी परतले. त्यानंतर काही वेळातच पिंजऱ्यात असलेले कुत्रे जोरजोरात भुंकू लागले. बाहेर नेमके काय घडले आहे, हे लक्षात येताच कुटुंबीयांनी भीतीपोटी थेट बाहेर न जाता सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यावेळी बंगल्याच्या परिसरात बिबट्या फिरताना दिसून आला. पिंजऱ्यातील कुत्र्याला पकडण्यासाठी बिबट्या पिंजऱ्याजवळ जाऊन वारंवार झडप घालण्याचा प्रयत्न करीत होता. मात्र पिंजरा बंद असल्याने त्याला कुत्र्यापर्यंत पोहोचता आले नाही.

कुत्र्याचा आवाज वाढताच म्हस्के कुटुंबीयांनी बंगल्याच्या चारही बाजूंचे दिवे लावले. प्रकाशझोतात बिबट्या आला आणि त्याने क्षणाचाही विलंब न करता बंगल्याच्या मागील बाजूस असलेल्या मक्याच्या शेताचा आसरा घेत तेथून पळ काढला. या संपूर्ण प्रकारामुळे रात्रीच्या वेळी शेतमळ्यातील बंगल्याजवळ बिबट्याचा वावर किती धोकादायक ठरू शकतो,
याची प्रचिती आली.

विशेष म्हणजे, या घटनेच्या सुमारे एक ते दीड तास आधी चाडेगाव शिवारात बिबट्या दिसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे चाडेगावकडून चेहडी बु.च्या दिशेने बिबट्याने मार्गक्रमण केले असावे, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
या घटनेला आणखी एक धक्कादायक संदर्भ आहे.

शिवाजीराव व शामराव म्हस्के यांची बहीण चेहडी बु.पासून काही अंतरावर असलेल्या परिसरात राहते. काही दिवसांपूर्वी बिबट्याने थेट तिच्या घराच्या तिसऱ्या मजल्यावर जाऊन कुत्र्याची शिकार केली होती. या घटनेनंतर वनविभागाने तेथे बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावला आहे. मात्र त्यानंतर काही दिवसांतच म्हस्के यांच्या भावाच्या शेतमळ्यात पिंजऱ्यात बंद असलेल्या कुत्र्यावर बिबट्याने हल्ल्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे.

दोन्ही ठिकाणांमधील रस्त्याचे अंतर काहीसे अधिक असले तरी शेतमळे, मोकळ्या जागा आणि झाडीच्या मार्गाने हा परिसर परस्परांशी जोडलेला आहे. त्यामुळे बहिणीच्या घराजवळ लावलेल्या पिंजऱ्याचा परिसर टाळून बिबट्या शेतमळ्यांच्या मार्गाने भावाच्या शेतात आला असावा का, आणि तेथे पिंजऱ्यातील कुत्र्याला लक्ष्य करून त्याने आपली भूक भागविण्याचा प्रयत्न केला का, याबाबत आता परिसरात चर्चा सुरू झाली आहे.

सीसीटीव्हीत कैद झालेला बिबट्या बहिणीच्या घराजवळ यापूर्वी दिसलेला तोच बिबट्या आहे का, हे मात्र वनविभागाच्या पाहणीनंतरच स्पष्ट होणार आहे.

घटनेची माहिती वनाधिकारी सुमित निर्मळ यांना देण्यात आली असून वनविभागाकडून परिसरातील बिबट्याच्या हालचालींचा मागोवा घेऊन पुढील उपाययोजना काय केली जाते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, चाडेगाव, चेहडी बु. आणि लगतच्या शेतमळ्यांमध्ये बिबट्याचा वावर वाढल्याने रात्रीच्या वेळी शेतकऱ्यांनी अधिक खबरदारी घ्यावी, अशी मागणी होत आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group