मनमाड : प्रतिनिधीशहरातून जाणाऱ्या इंदूर-पुणे महामार्गावरील रेल्वे वसाहतीसमोर (पंचवटी विभाग) एक अत्यंत दुर्दैवी आणि भीषण अपघात घडला. येवल्याहून मालेगावच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या एका ट्रकने रस्त्याने पायी जाणाऱ्या तरुणीला आणि बालकाला जोरदार धडक दिली. या अपघातात ट्रकच्या चाकाखाली चिरडून कोमल पगारे या तरुणीचा जागीच मृत्यू झाला, तर सोबत असलेले बालक गंभीर जखमी झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत कोमल पगारे (वय १९, रा. मोठे शिंगवे, ता. चांदवड) ही आपल्या नातेवाईक बालकासह रस्त्याने पायी जात असताना येवल्याहून मालेगावकडे जाणाऱ्या भरधाव ट्रकने (युपी २५ एफटी २२४९) भीषण धडक दिल्याने हा अपघात घडला.अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमी बालकाला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले. बालकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे.
घटनास्थळी पोलिसांनी तत्काळ पोहोचून वाहतूक सुरळीत केली असून, अपघातग्रस्त ट्रक व चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. इंदूर-पुणे महामार्गावरील सततच्या अपघातांमुळे स्थानिक नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. तरुणीच्या अपघाती मृत्यूची बातमी समजताच संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
एनएचएआयच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा : वंचित बहुजन आघाडीची मागणी
"शहरातून जाणाऱ्या इंदूर-पुणे महामार्गावरील संवेदनशील ठिकाणी तातडीने स्पीड ब्रेकर, रंबल स्ट्रिप्स, झेब्रा क्रॉसिंग आणि आवश्यक फलक बसवावेत. तसेच रस्ता सुरक्षेकडे दुर्लक्ष करणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (NHAI) जबाबदार अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडी करत आहे." — विलास आहिरे, शहराध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी