HSC Exam 2027 : बारावीच्या 'या' विषयाच्या परीक्षेच्या वेळेत मोठा बदल! बोर्डाकडून सुधारित वेळापत्रक जाहीर; विद्यार्थ्यांनी लगेच पाहा
HSC Exam 2027 : बारावीच्या 'या' विषयाच्या परीक्षेच्या वेळेत मोठा बदल! बोर्डाकडून सुधारित वेळापत्रक जाहीर; विद्यार्थ्यांनी लगेच पाहा
img
Nandini khandare More
बारावीच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च २०२७ च्या परीक्षेसंदर्भात अर्थशास्त्र विषयाच्या परीक्षेच्या वेळापत्रकात बदल केला आहे. याबाबत मंडळाने १९ नोव्हेंबर २०२६ रोजी अधिकृत शुद्धिपत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सुधारित वेळापत्रक तपासून परीक्षेच्या वेळेची नोंद घ्यावी.

 विद्यार्थ्यांनी सुधारित वेळापत्रकाची माहिती घेऊनच परीक्षेची तयारी करावी, असे आवाहन मंडळाकडून करण्यात आले आहे. नवीन वेळापत्रकानुसार, बारावीच्या अर्थशास्त्र विषयाची परीक्षा १७ फेब्रुवारी २०२७ रोजी दुपारच्या सत्रात घेतली जाणार आहे. हा पेपर दुपारी ३ वाजता सुरू होईल आणि सायंकाळी ६ वाजता संपेल. यापूर्वी हा पेपर सकाळच्या सत्रात घेण्याचे नियोजन होते. जुन्या वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांना सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत परीक्षा द्यावी लागणार होती. मात्र, आता या वेळेत बदल करण्यात आला आहे. राज्य मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी या बदलाबाबत माहिती दिली. मंडळाच्या पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक, कोल्हापूर, अमरावती, लातूर, छत्रपती संभाजीनगर आणि कोकण या नऊ विभागांमधून दहावी व बारावीच्या परीक्षा आयोजित केल्या जाणार आहेत.

या दोन्ही परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक मंडळाने ६ नोव्हेंबरपासून आपल्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले आहे. विद्यार्थ्यांना www.mahahsscboard.in या वेबसाइटवर जाऊन परीक्षेचे वेळापत्रक पाहता येणार आहे. दरम्यान, अर्थशास्त्राच्या पेपरच्या वेळेत केलेल्या बदलाशिवाय बारावी आणि दहावीच्या इतर विषयांच्या परीक्षांच्या तारखा व वेळांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी इतर विषयांच्या परीक्षांबाबत काळजी करण्याची गरज नाही.

मंडळाने विद्यार्थ्यांना आणखी एक महत्त्वाची सूचना दिली आहे. वेबसाइटवर दिलेले वेळापत्रक केवळ माहितीसाठी आहे. शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना दिले जाणारे छापील वेळापत्रक अंतिम मानले जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या शाळा किंवा महाविद्यालयाकडून मिळालेल्या वेळापत्रकानुसारच परीक्षेच्या तारखा आणि वेळ तपासावी. तसेच सोशल मीडियावर किंवा व्हॉट्सअॅपवर फिरणाऱ्या अप्रमाणित वेळापत्रकांवर विश्वास ठेवू नये, असेही मंडळाने स्पष्ट केले आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group