राज्यात महिलांचा सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महिलांवरील अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहे. दरम्यान, अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्याच्या कोंढवा भागातल्या बोपदेव घाटात 21 वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे.
गुरूवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास या मुलीवर तिघांनी अत्याचार केले. बोपदेव घाटामध्ये पीडित तरुणी आणि तरुण टू व्हीलरवर आले होते. तर आरोपीही टू व्हीलरवरच होते.
या प्रकरणाविषयी अधिक माहिती अशी की , गुरूवारी रात्री बोपदेव घाटात तीन नराधमांनी मुलाचा शर्ट काढला आणि बेल्टने त्याचे पाय बांधून ठेवले तसंच गाडीची चावी आणि मोबाईलही काढून घेतला. आरोपींनी मुलीची चांदीची अंगठीही काढून घेतली. आरोपींपैकी एकाकडे चाकू होता, या चाकूने त्याने धाक दाखवला. मुलीवर सामूहिक अत्याचार करून तीनही नराधम पुन्हा वर आले. मुलीला परत थोडं वरती घेऊन आले आणि तिला तिथे सोडलं आणि पळून गेले. यानंतर मुलीने बांधून ठेवलेल्या मित्राला सोडवलं.
दरम्यान, पीडित तरुणीने दिलेल्या माहितीनुसार पुणे पोलिसांनी दोन आरोपींचं स्केच तयार केलं आहे. हे आरोपी कुठे दिसले तर याबाबत पोलिसांना तात्काळ माहिती देण्याचं आवाहनही पोलिसांनी केलं आहे. पुणे पोलीस आणि क्राईम ब्रांचच्या 10 टीम पुणे आणि सातारा भागात आरोपींचा शोध घेत आहेत. याप्रकरणी पीडित तरुणीच्या कुटुंबालाही माहिती देण्यात आली आहे. पीडित महिला ससून रुग्णालयात असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. पीडित तरुणीला गंभीर इजा झाली नसली तरी ती मानसिक धक्क्यात आहे.
याप्रकरणी पोलिसांनी बोपदेव घाटातील सीसीटीव्ही ताब्यात घेतलं असून त्याची तपासणी सुरू आहे. आतापर्यंत पोलिसांनी 15-20 जणांची चौकशी करून त्यांना सोडून दिलं आहे. तसंच तपासासाठी पोलिसांनी स्नायफर डॉगचाही वापर केला आहे. या भागात रात्री 11 ते 3 पर्यंत पोलीस पेट्रोलिंग करतात पण काल तिकडे पोलीस का नव्हते? याचा तपास केला जात आहे. महिलेवर अत्याचार झाले तिथून जवळच पोलीस पोस्ट आहे, पण हे पोलीस स्टेशन नसून पेट्रोलिंग स्पॉट असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.