नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी):- नाशिक रोड व देवळाली रेल्वे स्थानकाच्या दरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने रेल्वे गाड्यांचा खोळंबा झाला.शनिवार-रविवाराची सुटी साधत प्रवासाला, पर्यटनाला निघालेल्या प्रवासांचे मध्य रेल्वेची वाहतूक नऊ तास ठप्प झाल्याने मोठे हाल झाले.
इगतपुरीहून रविवारी सकाळी ९.५५ वाजता भुसावळला सुटणारी इगतपुरी-भुसावळ मेमू तसेच देवळालीहून सकाळी सव्वा सातला सुटणारी देवळाली-भुसावळ मेमो या दोन रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. काही गाड्यांना पाच ते नऊ तास उशीर झाला तर काहींचे मार्ग बदलण्यात आले.
नाशिक रोड ते देवळाली रेल्वे स्थानकादरम्यान ओव्हरहेड वायरमध्ये शनिवारी रात्री दीडच्या सुमारास मोठा बिघाड झाला. या वायरव्दारे रेल्वे गाड्यांना वीज पुरवठा होतो. तो खंडीत झाल्याने मुंबईच्या दिशेने होणारी आणि मुंबईहून भुसावळच्या दिशेने होणारी रेल्वे वाहतूक नऊ तास ठप्प होती. ओव्हर हेड वायर दुरुस्तीचे काम रविवारी सकाळी अकरा वाजता पूर्ण झाले. त्यानंतर नऊ तासांनी वाहतूक पूर्ववत झाली. या घटनेमुळे काही रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या तर काहींचे मार्ग बदलण्यात आल्याचे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले.
देवळाली स्थानकाजवळ भुसावळच्या दिशेने जाणा-या मार्गावर ओव्हरहेड वायर शनिवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास तुटल्याने अप आणि डाऊन मार्गावरील रेल्वे सेवा ठप्प झाली. नाशिक रोड, भुसावळच्या दिशेने जाणा-या रेल्वे उशिरा धावत होत्या. मुंबईवरून शनिवारी रात्री आपल्या निर्धारीत वेळेला निघालेल्या शालीमार एक्सप्रेस, पाटलीपुत्र, पठाणकोट, बनारस, हाटिया या गाड्या तसेच रविवारी सकाळी मुंबईवरून नांदेडला जाणारी तपोवन तसेच काशी, पुष्पक, कामख्या या सर्व गाड्या दोन ते चार तास विलंबाने धावल्या. ओव्हहेड तुटल्याने या गाड्या थांबवून टप्प्या टप्प्याने सोडण्यात आल्या.
मुंबईला जाणा-या सेवा ग्राम एक्सप्रेस, राजधानी, वंदे भारत, हावडा मेल, बनारस-मुंबई, पंचवटी एक्सप्रेस, धुळे-दादर, राज्यराणी, गोदावरी, पाटलीपुत्र,गोरखपूर, हाटिया या सर्व रेल्वेगाड्या अर्धा ते तीन तास उशिराने धावल्या.
मुंबई-हावडा गीतांजली, मुंबई-अयोध्या तुलसी एक्सप्रेस, मुंबई-भागलपूर एक्सप्रेस या तिन्ही गाड्या मार्गात बदल करून कल्याण, वसई, सूरत, जळगाव, भुसावळमार्गे आपल्या निर्धारीत स्थळी रवाना करण्यात आल्या. तर मुंबई-शिर्डी वंदेभारत ही पुणे मार्गे वळविण्यात आली होती. त्यामुळे या गाड्यांना मोठा विलंब झाला. पंचवटी देखील रद्द झाली.
रविवारी मुंबईतील कार्यालयाने सुटी असल्याने या गाडीने प्रवास करणारे नोकरदार, व्यावसायिक हे रविवारी गाडीत नव्हते. त्यांना दिलासा मिळाला. अन्य गाड्यातील प्रवाशांचे मात्र हाल झाले. ओव्हरहेड वायर तुटल्याने अनेक गाड्या जवळच्या स्थानकांवर थांबविण्यात आल्या होत्या.
“मे आय हेल्प यू” बूथ सर्व प्रमुख स्थानकांवर सुरु करण्यात आले असून प्रवाशांना मार्गदर्शनासाठी रेल्वे कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
तिकीट परताव्यासाठी विशेष काऊंटर स्थानकांवर उघडण्यात आले आहेत. वळविलेल्या गाड्यांची घोषणा सर्व संबंधित स्थानकांवर सातत्याने करण्यात येत आहे जेणेकरून प्रवाशांना योग्य माहिती मिळू शकेल. अनारक्षित डब्यातील प्रवाशांना चहा, पाण्याच्या बाटल्या आणि नाश्ता वितरित करण्यात आला.