सातपूर - नाशिक जिल्हा हा कायद्याचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. पोलीस प्रशासनाने यापूर्वी राबविलेल्या विशेष मोहिमांमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींना चांगलाच वचक बसला होता. त्यामुळे काही काळ गुन्हेगारीचे प्रमाण घटले होते. मात्र, अलीकडील काही दिवसांत सातपूर परिसरात चोरीच्या घटनांनी पुन्हा डोके वर काढले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
बुधवार (दि.१२ ) रोजी मध्यरात्रीच्या सुमारास सातपूर परिसरातील तीन वेगवेगळ्या मंदिरांमध्ये चोरीच्या घटना घडल्या. एका मंदिरातील दानपेटी फोडून त्यातील रोकड लंपास करण्यात आली. दुसऱ्या ठिकाणी अज्ञात चोरट्यांनी मंदिरातील मूर्तीच चोरी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तर तिसऱ्या मंदिरात दानपेटी फोडण्याचा प्रयत्न यशस्वी झाल्याची माहिती मिळाली आहे. या सर्व घटना एकाच रात्रीत घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
सातपूर कॉलनी, अशोक नगर, श्रमिक नगर, कामगार नगर या भागांत अलीकडे चोरीच्या घटना वाढल्या असून नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. चोरीच्या घटनेमुळे नागरिकांनी संताप व्यक्त करत पोलीस प्रशासनाने रात्रीच्या वेळी गस्त वाढवावी व भुरट्या चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस विभागीय अध्यक्ष प्रवीण नागरे यांनी केली आहे.