नाशिक रोड (भ्रमर प्रतिनिधी):-गोसावीवाडी येथील सुमित पगारे हत्याकांडातील प्रमुख संशयित राजू शेख, जमील रंगरेज आणि आदिल शेख यांना नाशिक रोड पोलिसांच्या क्राइम युनिट व गुंडा पथकाच्या संयुक्त पथकाने कल्याण येथून ताब्यात घेतले आहे. पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार यांच्या पथकाने कल्याण येथे जाऊन ही कारवाई केली.
सुमित पगारे हत्याकांडानंतर राजू शेख याने पगारे कुटुंबीयांना फोन करून धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला होता. मृताचा आत्येभाऊ सागर उर्फ बंटी मोरे याला फोन करून, "माझ्या विरोधात मोर्चा काढला तर सर्वांना जीवे ठार मारू... १५ मिनिटांत मर्डर करू," अशी धमकी दिल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला होता. या धमकीची ऑडिओ क्लिपही पोलिसांकडे देण्यात आली होती.
या प्रकरणात पगारे कुटुंबीयांनी नाशिक रोड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर संशयितांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. अखेर संयुक्त पथकाने कल्याण गाठून तिघांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे.
धमकीच्या ऑडिओ क्लिपने तपासाला वेग
पगारे कुटुंबीयांना दिलेल्या कथित धमकीमुळे प्रकरण अधिक गंभीर बनले होते. ऑडिओ क्लिपच्या आधारेही पोलिसांकडून तपास करण्यात येत होता. ताब्यात घेतलेल्या संशयितांकडून हत्याकांड तसेच धमकीप्रकरणी अधिक माहिती मिळण्याची शक्यता आहे.