राज्यात महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर असून महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना काही केल्या थांबत नाही आहेत. गेल्या काही महिन्यांआधीच पुण्याच्या भोर तालुक्यात एका नराधमाने साडेतीन वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिचीनिर्घृण हत्या केली होती. दरम्यान आता याच तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.
पुण्याच्या भोर तालुक्यातील एका गावात एका नराधमाने अल्पवयीन शाळकरी मुलीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. पण पीडितेनं धाडस दाखवत नराधमाच्या तावडीतून स्वतःची सुटका करून घेतली. तिने अक्षरशः निर्वस्त्रावस्थेत घराबाहेर पळं काढला. मुलीने दाखवलेल्या या धाडसामुळे ती नराधमाच्या कचाट्यातून सुखरूप बाहेर पडली. मात्र या घटनेनं संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तत्काळ कारवाई करत फरार आरोपीला अटक केली आहे.
'तुझे वडील घरात बसलेत' अशी केली बतावणी
पीडित अल्पवयीन मुलगी नेहमीप्रमाणे शाळा सुटल्यानंतर घरी जात होती. ती रस्त्याने जात असतानाच आरोपीने तिला गाठले. "तुझे वडील घरात बसले आहेत, त्यांनी तुला आत बोलावलं आहे," अशी खोटी बतावणी करत या नराधमाने मुलीला एका घरात नेलं. मुलगी घरात जाताच आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न सुरू केला.
अचानक ओढवलेल्या या भयानक प्रसंगाने मुलगी घाबरली, मात्र तिने अत्यंत शिताफीने स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. तिने आरोपीकडे पाणी पिण्याचा बहाना केला. पाणी पिण्यासाठी ती किचनमध्ये आली. आरोपीचं लक्ष विचलित होताच, तिने प्रसंगावधान दाखवलं आणि नराधमाच्या तावडीतून स्वतःची सुटका करून घेतली. तिने घराच्या मागच्या दारातून थेट बाहेर पळ काढला. ती निर्वस्त्रावस्थेत घराबाहेर पडली आणि रस्त्यावर धावली. यावेळी आसपासच्या लोकांनी तिला तातडीने कपडे दिले.
भोर पोलिसांनी तपासाची चक्रे जलदगतीने फिरवत तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपीचा माग काढला. अखेर गुन्हा दाखल झाल्यापासून अवघ्या ३६ तासांच्या आत पोलिसांनी फरार आरोपीला सातारा येथून शिताफीने अटक केली, याबाबतची माहिती भोर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश माने यांनी दिली.