आनंदाच्या क्षणी दुःखाचा धक्का; कन्यादान करताना नवरीच्या वडिलांचा  मृत्यू
आनंदाच्या क्षणी दुःखाचा धक्का; कन्यादान करताना नवरीच्या वडिलांचा मृत्यू
img
Nandini khandare More



माणसाच्या आयुष्यात कोणता क्षण कधी आणि कसा येईल याचा काहीही नेम नसतो. याचीच प्रचिती एका अतिशय हृदयद्रावक घटनेतून आली आहे. आपल्या मुलीच्या लग्नाचे आणि सुखी संसाराचे स्वप्न बघणाऱ्या बापाला त्याच्या लेकीच्या लग्नातच मृत्यूने गाठले . ही घटना जीवाला चटका लावून जाणारी ठरली. 

सिंदखेड राजा तालुक्यातील वरदडी येथे कन्यादान सुरू असतानाच वधू पित्याचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू झाला. कुरुमदास कुंडलिक भुतेकर (५०) असे या मृत पित्याचे नाव आहे. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. 

वरदडी येथील कुरुमदास भुतेकर यांची मुलगी नंदिनी हिचा विवाह जालना जिल्ह्यातील मंठा येथील प्रदीप नानोटे यांच्याशी ठरला होता. गुरुवारी सायंकाळी लग्नाचा मुख्य सोहळा सुरू होता. सनई-चौघड्यांच्या सुरात आणि पाहुण्यांच्या उपस्थितीत विवाह सोहळा मोठ्या थाटात पार पडत होता. मंगलाष्टका आटोपल्यानंतर लग्नातील सर्वात भावनिक विधी कन्यादान सुरू झाले. कुरुमदास हे आपल्या मुलीचे हात वरपित्याच्या हातात सोपवत असतानाच अचानक त्यांच्या छातीत कळ आली. त्यानंतर ते लग्नाच्या विधी सुरु असलेल्या ठिकाणी कोसळले.

सुरुवातीला उपस्थितांना वाटले की कामाच्या ताणामुळे किंवा थकव्यामुळे त्यांना चक्कर आली असावी. नातेवाईकांनी त्यांना तातडीने सावरले आणि जवळच्या खाजगी रुग्णालयात नेले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती. डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. अवघ्या काही मिनिटांपूर्वी आनंदाने नाचणारे वऱ्हाडी आणि अक्षता टाकणारे हात या बातमीने सुन्न झाले होते.

मृत कुरुमदास भुतेकर यांची प्रकृती गेल्या काही काळापासून नाजूक होती. डिसेंबर महिन्यातच त्यांच्यावर एक मोठी बायपास शस्त्रक्रिया करण्यात आली होती. डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला होता, परंतु आपल्या लेकीचे लग्न स्वतःच्या हाताने लावून देण्याचे त्यांचे स्वप्न होते. हे स्वप्न पूर्ण करण्याच्या ओढीत त्यांनी सर्व तयारी केली होती. मात्र त्याच विधीदरम्यान काळाने त्यांच्यावर झडप घातली.ज्या घरातून लेकीची आनंदाने पाठवणी होणार होती, त्याच घरातून पित्याची अंत्ययात्रा काढण्याची वेळ आल्याने वरदडी ग्रामस्थांचे डोळे पाणावले. 

इतर बातम्या
Join Whatsapp Group