नाशिकमध्ये एकामागे एक धक्कादायक प्रकारणांचा उलगडा होत आहे. भोंदूबाबा अशोक खरात, रवींद्र एरंडे यांचे खळबळजनक प्रकरण ताजे असतानाच नाशिकच्या आयटी कंपनीत वरिष्ठांकडूनच कथित धर्मांतर करण्यात येत असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका आंतरराष्ट्रीय आयटी कंपनीत धर्मांतर करून महिलांचं लैंगिक शोषण करण्यात येत असल्याचं समोर आलं आहे. या घटनेने संपूर्ण देशच हादरला आहे. या प्रकरणात कंपनीच्या टीम लीडरसह 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कंपनीत हिंदू मुलींना टार्गेट करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून या तपासात आणखी काही धक्कादायक आणि डोकं चक्रावणारी माहिती समोर आली आहे. त्यामुळे आणखीनच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या नामांकित कंपनीत विशिष्ट समुदायातील तरुण-तरुणींचा एक व्हॉट्सॲप ग्रुप सक्रिय होता. या ग्रुपवर केवळ कंपनीतील राजकारण किंवा गटबाजीच नाही, तर 'पुढचे लक्ष्य' कोणाला करायचे, यावरही चर्चा व्हायची, असा संशय पीडित तरुणींनी व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे, ज्या तरुणींना जाळ्यात ओढले जायचे, त्यांच्यासाठी पुन्हा एक स्वतंत्र व्हॉट्सॲप ग्रुप बनवून त्यांचे ब्रेनवॉश केले जात असे.
संशयित आरोपी तरुणींना जाळ्यात ओढण्यासाठी अत्यंत नियोजनबद्ध पावले उचलत होते. संशयित तरुण स्वतःला 'सिंगल' असल्याचे भासवून तरुणींचे कौतुक करायचे, त्यांच्याशी गोड बोलून फ्लर्टिंग करायचे आणि नंतर जेवणाच्या बहाण्याने बाहेर न्यायचे. कंपनीतील कामाचा फायदा घेत, "तुला हव्या त्या ठिकाणी बदली करून देतो किंवा रजा मिळवून देतो," असे सांगून तरुणींना उपकृत करायचे आणि त्यातून जवळीक साधण्याचा प्रयत्न व्हायचा. ज्या तरुणींनी या आमिषांना बळी पडण्यास नकार दिला, त्यांना मानसिक त्रास दिला जायचा, ज्यामुळे अनेक तरुणींनी नोकरीचा राजीनामा दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
या कटात केवळ तरुणच नाही तर तरुणींचाही सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी नाशिक पोलिसांनी नऊ गुन्हे नोंदवले आहेत. या गुन्ह्यांत आसिफ अन्सारी, शफी शेख, रझा मेमन, तौसिफ अत्तार, शाहरूख कुरेशी, दानिश शेख ‘एसआयटी’च्या कोठडीत असून, निदा खान हिचा शोध सुरू आहे. एका प्रतिष्ठित आयटी कंपनीत अशा प्रकारे संघटित गुन्हेगारी आणि धार्मिक कट्टरतेचे प्रकार घडत असल्याने नाशिकमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.