नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी):- शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे मनपा गटनेते केशव पोरजे यांनी पक्षातील नगरसेवक फुटणार असल्याच्या चर्चांना ठाम शब्दांत फेटाळून लावत, "कुठलाही नगरसेवक फुटणार नाही आणि शिवसेना शिंदे गटात जाणार नाही," अशी स्पष्ट भूमिका मांडली. सध्या केवळ अफवा आणि गैरसमज पसरवण्याचे काम सुरू असून, त्यामागे शिंदे गट असल्याचा आरोपही त्यांनी केला.
पोरजे म्हणाले, ठाकरे गटातील नगरसेवक फोडण्यासाठी "तुम्हाला उपमहापौर करू" असे आमिष दाखवून डील करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. आमच्या पाच ते सहा नगरसेवकांशी एका एजंटच्या माध्यमातून संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच विकासकामांसाठी पाच कोटी रुपयांचा निधी देण्याचे आमिषही दाखवण्यात आले असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.
ते पुढे म्हणाले, आमच्या प्रभागांना विकासनिधी मिळत नसल्याने आम्ही याबाबत नुकतीच महापालिका आयुक्तांची भेट घेतली आहे. निधीची अडवणूक करून नगरसेवकांवर दबाव आणण्याचा आणि त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, अशा कोणत्याही दबावाला किंवा आमिषाला आमचे नगरसेवक बळी पडणार नाहीत.
"जे नगरसेवक पक्ष सोडून जातील ते कायद्याने अपात्र ठरतील. तसेच मतदारही त्यांना कधीही माफ करणार नाहीत," असा इशाराही पोरजे यांनी दिला.
या संपूर्ण घडामोडीबाबत आपण आज सकाळी खासदार संजय राऊत यांच्याशी चर्चा केल्याचे सांगत, "आमचे सर्व नगरसेवक पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास ठेवून त्यांच्यासोबतच ठामपणे उभे राहतील," अशी भूमिका केशव पोरजे यांनी स्पष्ट केली.