सप्तशृंगगडावर २२ किलो चांदीचा अपहार; मंदिर ट्रस्टच्या कारभारावर मोठा संशय
सप्तशृंगगडावर २२ किलो चांदीचा अपहार; मंदिर ट्रस्टच्या कारभारावर मोठा संशय
img
दैनिक भ्रमर



नाशिक: लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सप्तशृंगी गडावरील मंदिराच्या नक्षीकामातील साडेबावीस किलो चांदीमध्ये तफावत आढळून आली आहे. विशेष म्हणजे विश्वस्तांनी व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे सुट्टीवर असताना रात्रीच्या वेळी गर्भगृहातील चांदी काढल्याची बाब विभागीय आयुक्त कार्यालयातील चौकशीत निदर्शनास आली आहे.

या प्रकरणी ट्रस्टचे तत्कालिन अध्यक्ष, विश्वस्त व संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करून अपहार झालेल्या चांदीची रक्कम व्याजासह वसूल करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विठोबा द्यानद्यान यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

 नोंदी आणि प्रत्यक्ष मोजणीत मोठी तफावत 

गर्भगृहातील नक्षीकामासाठी पूर्वीच्या नोंदीनुसार सुमारे ४०६ किलो चांदी वापरली असताना, प्रत्यक्ष मोजणीत ३८३ किलो ७०३ ग्रॅम चांदी उपलब्ध असल्याचे आढळले. त्यामुळे अपहाराचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. याबाबत द्यानद्यान यांनी विभागीय आयुक्तांकडे तक्रार केली आहे. विभागीय आयुक्त कार्यालय तसेच जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत संबंधित अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

विभागीय आयुक्तांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले असून, अपर आयुक्त (महसूल) जितेंद्र वाघ यांनी चौकशीबाबत आदेश काढले आहेत. सप्तशृंगी ट्रस्टमधील चांदीच्या अपहार प्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयानेही सहाय्यक जिल्हाधिकारी (कळवण), तहसीलदार कळवण तसेच ट्रस्टच्या कार्यकारी अधिकाऱ्यांना सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत यांच्या माध्यमातून हे आदेश काढण्यात आले आहेत. या प्रकरणी भादंवि कलम ४०९, ४२०, १२० (ब) अंतर्गत फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी विठोबा द्यानद्यान यांनी केली आहे.

त्र्यंबकेश्वरप्रमाणेच चौकशी करण्याची मागणी 

श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर देवस्थान येथे दर्शनासाठी विश्वस्तांकडून केल्या जाणाऱ्या काळाबाजाराचा पर्दाफाश झाला आहे. त्यामुळे त्र्यंबकेश्वरप्रमाणेच या ठिकाणी चौकशी केल्यास तत्कालीन विश्वस्तांचा मोठा गैरकारभार उघडकीस येण्याची शक्यता आहे. माजी विश्वस्तांकडून अनेक चुकीचे प्रकार घडले असून, चौकशीतून ते उघड होण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्थानिकांकडूनही गेल्या कारभाराच्या चौकशीची मागणी केली जात आहे.

अंधारात काढली चांदी

सप्तशृंगी ट्रस्टने १५ सप्टेंबर २०२१ रोजी ठराव करून चांदी दिवसा काढण्याचे नियोजन केले होते. परंतु, दुसऱ्याच दिवशी रात्रीच्या वेळी मूल्यमापकाच्या अनुपस्थितीत गर्भगृहातील चांदी उतरविण्यात आली. यासंदर्भात ट्रस्टचे व्यवस्थापक दहातोंडे यांनी अध्यक्ष आणि धर्मादाय आयुक्तांना दिलेले पत्र (जावक क्र. २०२१-२२-२८५) मोठा पुरावा ठरल्याचे समोर आले आहे. त्याचा मनात राग धरून विश्वस्तांनी दहातोंडेंच्या विरोधात कटकारस्थान करून त्यांच्यावरच निलंबनाची कारवाई केल्याची चर्चा गडावर सुरू आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group