नाशिक (भ्रमर प्रतिनिधी):- मुंबई नाक्याजवळील श्रीहरी कुटे मार्गावर एका बंगल्यामध्ये फिटनेस सेंटरच्या नावाखाली महिलांकडून देहविक्रीचा व्यवसाय करून घेतले जात असल्याची गोपनीय माहिती मिळताच मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून एका पिडीत महिलेची सुटका केली तर दोघा संशयितांविरूद्ध अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम १५६ कलम ३, ४, ५ अन्वये मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मध्यवर्ती गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली श्रीहरी कुटे मार्गावरील शिवम नावाच्या बंगल्यात छापा टाकून ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी संजय विजय शर्मा, (रा.अशोकामार्ग, नाशिक) आणि कृष्णाकुमार सिताराम यादव (वय २६, रा. श्रीहरी कुटे मार्ग, नाशिक. मुळ गाव अथरा ता. जि.हजारीबाग, झारखंड) यांच्याविरूद्ध मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
उपनिरीक्षक विश्वास चव्हाणके, महिला पोलीस उपनिरीक्षक सुवर्णा महाजन, सहाय्यक पोलीस निरीक्षक शेरखान पठाण, हवालदार गणेश वाघ, प्रजित ठाकूर, युवराज कानमहाले, अंमलदार योगेश परदेशी, अतुल पाटील, महिला हवालदार लिला सुकटे, महिला अंमलदार वैशाली घरटे, चालक हवालदार दीपक पाटील आणि विपला या एनजीओ संस्थेचे तुषार सुर्यवंशी, प्रियदर्शनी पवार यांच्या पथकाने ही कामगिरी यशस्वी केली.