पिंजर्यातील कुत्र्यावर हल्ल्याचा प्रयत्न सीसीटीव्हीत कैद
नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी) :- चेहेडी बुद्रुक येथील म्हस्के मळा परिसरात गेल्या दोन महिन्यांपासून वारंवार दर्शन देणार्या बिबट्याची दहशत कायम असून, आज पहाटे पुन्हा एकदा बिबट्याने पिंजर्यात बंद असलेल्या गुड्डू नामक कुत्र्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला; मात्र कुत्रा पिंजर्यात असल्याने आणि त्याने वेळीच आवाज केल्याने बिबट्याला हल्ला करता आला नाही. बिबट्याच्या या हालचाली बंगल्याबाहेर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाल्या आहेत. या घटनेमुळे चेहेडी बुद्रुक, म्हस्के मळा आणि परिसरातील शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
चेहेडी बुद्रुक, म्हस्के मळा, तसेच चाडेगाव परिसरात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्याचा वावर वाढला आहे. दि. 29 ऑगस्ट रोजी चाडेगाव परिसरात एका इमारतीच्या तिसर्या मजल्यावर गेलेल्या बिबट्याने तेथील कुत्र्यावर हल्ला केला होता. त्यानंतर दि. 13 सप्टेंबर रोजी शिवाजीराव व शामराव म्हस्के यांच्या चेहेडी येथील बंगल्याबाहेर असलेल्या कुत्र्यावर बिबट्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता; मात्र कुत्रा पिंजर्यात असल्याने त्याचा जीव वाचला. या घटनांनंतरही बिबट्याचा वावर थांबलेला नसल्याने परिसरातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
आज पहाटे तीन वाजेच्या सुमारास बिबट्याने पुन्हा म्हस्के यांच्या बंगल्याबाहेर असलेल्या पिंजर्याकडे धाव घेत त्यातील कुत्र्यावर झडप घालण्याचा प्रयत्न केला; मात्र कुत्रा पिंजर्यात सुरक्षित असल्याने बिबट्याला त्याच्यापर्यंत पोहोचता आले नाही. कुत्र्याने आवाज केल्याने बिबट्याने तेथून तत्काळ पळ काढला. बिबट्याच्या हल्ल्याचा हा प्रयत्न सीसीटीव्ही कॅमेर्यात स्पष्टपणे कैद झाला असून, याबाबत वन विभागाला माहिती देण्यात आली आहे.
बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाकडून परिसरात पिंजरे लावले जातात; मात्र केवळ रिकामे पिंजरे लावून बिबट्या त्यामध्ये अडकणार कसा, असा प्रश्न आता शेतकरी उपस्थित करीत आहेत. बिबट्याला पिंजर्याकडे आकर्षित करण्यासाठी त्यामध्ये शेळी किंवा अन्य योग्य प्राणी ठेवणे आवश्यक असते;
मात्र वन विभागाकडून अनेकदा केवळ रिकामे पिंजरे उपलब्ध करून दिले जातात. पिंजर्यात ठेवण्यासाठी शेळी किंवा अन्य प्राण्याची व्यवस्था करण्याची जबाबदारी नेमकी कोणाची, त्यासाठी होणारा खर्च कोणी करायचा आणि बिबट्याला जेरबंद करण्यासाठी आवश्यक असलेली प्रभावी यंत्रणा कोण उभारणार, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.