महिलांचे शोषण आणि अनेकांची आर्थिक फसवणूक केल्या प्रकरणी तुरुंगात असणाऱ्या भोंदू अशोक खरात प्रकरणातील चौकशीला वेग आला आहे. राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकर यांना शिर्डी पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. शिर्डी पोलिसांकडून काल प्रतिभा चाकणकरांची 8 तास चौकशी करण्यात आली.
समता पतसंस्थेत प्रतिभा चाकणकर आणि कुटुंबीयांच्या नावे 4 खाती असल्याचं समोर आलंय. स्वत: प्रतिभांच्या नावे 2 तर मुलांच्या नावे 2 खाती आहेत. या खात्यांवरुन 2 कोटींच्यावर आर्थिक व्यवहार झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे शिर्डी पोलिसांकडून प्रतिभा चाकणकर आणि त्यांचा मुलगा तन्मय याचा जबाब नोंदवण्यात आला.
पोलिसांच्या चौकशीनंतर प्रतिभा चाकणकरांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी माझ्या नावाची खाती बनावट आहे. सह्या देखील नाही. मी एकही रुपयाची देखील उलाढाल केलेली नाही. माध्यमांवर बातम्या बघून आम्ही जबाब द्यायला आलो. शिर्डी पोलिसांची नोटीस अद्याप मिळालेली नाही. कागदपत्रे आणि सह्या बनावट असल्याची प्रतिक्रिया प्रतिभा चाकणकर यांनी दिली.
तसेच प्रतिभा चाकणकर आणि तन्मय चाकणकर यांची बनावट खाती उघडण्यात आली. त्या समता पतसंस्थेत कधीही गेल्या नाहीत. खाते उघडताना पत्ता देखील चुकीचा वापरण्यात आला. प्रतिभा आणि तन्मय याच्या सह्यांचे नमुने पोलिसांना दिले. सर्व खातरजमा झाल्यानंतर आम्ही बाहेर पडलो. चाकणकर पोलिसांना वेळोवेळी सहकार्य आणि तपासात मदत करतील. पोलिसांची चौकशी सुरू असून कायदेशीर कारवाई बाबत चर्चा करूनच निर्णय घेऊ...मात्र पतसंस्थेत खाते संदर्भात कोणतेही तत्थ नाही, अशी माहिती प्रतिभा चाकणकर यांच्या वकील जयश्री काळे-पालवे यांनी दिली.