अंबड येथील ट्रक अडकण्याच्या घटनेबाबत नाशिक महापालिकेकडून
अंबड येथील ट्रक अडकण्याच्या घटनेबाबत नाशिक महापालिकेकडून "ही" वस्तुस्थिती स्पष्ट
img
दैनिक भ्रमर
नाशिक : अंबड परिसरातील साईड शोल्डरमध्ये ट्रक अडकल्याबाबत प्रसिद्ध झालेल्या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिकेने संबंधित घटनेची वस्तुस्थिती स्पष्ट केली आहे.

अंबड परिसरात अमृत योजनेअंतर्गत १००० मिमी व्यासाची जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. ही जलवाहिनी मुख्य रस्त्याखाली टाकण्यात आलेली नसून, रस्त्यालगतच्या साईड शोल्डरमध्ये टाकण्यात आली आहे. जलवाहिनी टाकण्यासाठी करण्यात आलेले खोदकाम मुख्य वाहतूक मार्गावर झालेले नाही.

संबंधित साईड शोल्डर हा यापूर्वी नियमित रस्ता अथवा वाहतुकीसाठीचा मार्ग नव्हता. मात्र मुख्य रस्त्यावर वाहनांची वर्दळ अधिक असल्याने काही वाहने प्रसंगी या भागाचा वापर करतात. त्यामुळे हा भाग मुख्य रस्त्याचा नियमित हिस्सा असल्याचा गैरसमज होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, संबंधित घटनेतील ट्रक हा मुख्य रस्त्यावरून जाणारा बाहेरील वाहन नसून, साईड शोल्डरच्या पुनर्स्थापनेसाठी खडी घेऊन आलेला संबंधित कंत्राटदाराचा ट्रक आहे. पुनर्स्थापनेचे साहित्य खाली करत असताना ट्रक साईड शोल्डरमध्ये अडकला. त्यामुळे सदर घटना मुख्य रस्ता खचल्यामुळे झालेली नसून, सुरू असलेल्या पुनर्स्थापना कामादरम्यान घडली आहे.

नाशिक महानगरपालिकेच्या वतीने संबंधित साईड शोल्डरच्या पुनर्स्थापनेचे काम गेल्या पाच दिवसांपासून सुरू असून, सुमारे १.५ किलोमीटर लांबीच्या भागाची पुनर्स्थापना करण्यात येत आहे. हे काम पुढील सात दिवसांत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
नागरिकांची गैरसोय कमी करण्यासाठी पुनर्स्थापनेच्या कामाला गती देण्यात आली असून, काम पूर्ण झाल्यानंतर संबंधित साईड शोल्डर पूर्ववत करण्यात येणार आहे.

त्यामुळे अंबड येथील ही घटना मुख्य रस्ता खचल्याची नसून, अमृत योजनेअंतर्गत सुरू असलेल्या जलवाहिनीच्या कामानंतर साईड शोल्डरच्या पुनर्स्थापनेदरम्यान घडलेली घटना आहे. संबंधित कामाची सद्यस्थिती आणि प्रत्यक्ष परिस्थिती लक्षात घेऊनच या घटनेकडे पाहणे आवश्यक असल्याचे नाशिक महानगरपालिकेने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, नाशिक महानगरपालिकेने सर्व माध्यम प्रतिनिधींना आवाहन केले आहे की, महापालिकेच्या कामांशी संबंधित कोणतीही घटना अथवा वृत्त प्रसिद्ध करण्यापूर्वी संबंधित विभागाकडून वस्तुस्थितीची खातरजमा करून घ्यावी. यामुळे घटनेची अचूक माहिती माध्यमांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल आणि नागरिकांमध्ये चुकीचा संदेश जाण्याची शक्यता टाळता येईल. वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी नाशिक महानगरपालिका माध्यमांना आवश्यक माहिती व सहकार्य करण्यास सदैव तत्पर आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group