नाशिक (प्रतिनिधी) :- द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया अर्थात आयसीएआय कडून मे महिन्यात घेण्यात आलेल्या सीए फाउंडेशन परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये नाशिकची साक्षी जैन देशात पहिली आली आहे. तिने ४०० पैकी ३७१ गुण मिळवून ९२.७५ टक्क्यांसह देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. तर उत्कर्ष कैलास वाणी शहरात दुसरा आला असून ४०० पैकी ३४३ गुण आणि अनन्या अतुल माहेश्वरी तिसरी आली आहे. तिला ४०० पैकी ३४० गुण मिळाले आहेत. नाशिक शहरातून यंदा ९८७ विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. त्यापैकी ३२५ विद्यार्थी परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत.
साक्षी ही मूळची पाचोऱ्याची आहे. प्राथमिक शिक्षण पाचोऱ्यात झाल्यानंतर ती 11वी पासून नाशिकमध्ये आहे. तिचे वडील व्यावसायिक असून आधीपासून फायनान्स फिल्डची आवड असल्याने तिने सीए होण्याचे ध्येय ठेवले होते. 11वी व 12वी बी वाय के मधून पूर्ण केल्यानंतर ती एस एम आर के महाविद्यालयातून ग्रॅज्युएशन करीत आहे. रोज ती 9 ते 10 तास क्लास मध्ये अभ्यास करायची. स्टडी लिव्हच्या काळात ती 10 ते 12 तास अभ्यास करायची. तिला इम्पॅक्ट कॉमर्स अकादमीच्या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
या निकालाबाबत बोलतांना आयसीएआय नाशिक शाखेचे अध्यक्ष सीए अभिजित मोदी यांनी सांगितले की, नाशिकच्या शैक्षणिक इतिहासांमध्ये पहिल्यांदाच असे घडले आहे की सीए फाउंडेशन परीक्षेमध्ये नाशिकचा विद्यार्थी देशात पहिला आला आहे. ही गोष्ट नक्कीच नाशिक शहराला 'एज्युकेशन हब' कडे नेणारी आहे. सोबतच निकाला मधला सरासरी मुलींचा टक्का वाढला आहे. याशिवाय नाशिक केंद्राचा निकालही पुणे, मुंबई च्या तुलनेमध्ये अधिक आहे. ही गोष्ट नाशिक आयसीएआयसाठी खूप महत्वाची आहे.हे या निकालाचे वेगळेपण म्हणता येईल. ही परीक्षा म्हणजे देशातील कठीण परीक्षापैकी एक असलेल्या सीए परीक्षेचा हा पहिला महत्वपूर्ण टप्पा आहे. यंदा साक्षी जैनच्या रूपाने नाशिकच्या विद्यार्थीनीने मिळवलेले यश नक्कीच अभिमानास्पद आहे. यातून अनेक विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळणार आहे. या परीक्षेत यश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी अभ्यासात सातत्य ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. ही गोष्ट विद्यार्थ्यांनी नेहमीच लक्षात ठेवली पाहिजे.
या निकालानंतर आयसीएआय नाशिक शाखेचे उपाध्यक्ष सीए मनोज तांबे, सचिव सीए विशाल वाणी, कोषाध्यक्ष सीए दिलीप बोरसे तसेच वेस्टन इंडिया चार्टर्ड अकाउंटंट स्टुडंट असोसिएशन अर्थात विकासा कमिटीचे चेअरमन सीए रोहन कुलकर्णी, सहसदस्य सीए शुभम मुंदडा, सीए पियुष चांडक उपाध्यक्ष वेस्टन इंडिया रिजनल कौन्सिल आणि कार्यकारिणी सदस्य तसेच माजी अध्यक्ष सीए जितेंद्र फाफट यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.