इम्तियाज जलील निदाला नाशिकमध्ये का भेटले?
इम्तियाज जलील निदाला नाशिकमध्ये का भेटले?" मंत्री संजय शिरसाटांचा सवाल; एसआयटी चौकशीची मागणी
img
नितीशा कुलकर्णी





संभाजीनगरमध्ये गाजलेल्या निदा खान अटक प्रकरणाचे पडसाद आता मंत्रालयापर्यंत पोहोचले आहेत. या प्रकरणातील गूढ उकलण्यासाठी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून एसआयटी चौकशीची मागणी केली आहे. एमआयएमच्या नेत्यांवर गंभीर आरोप करतानाच, हे प्रकरण म्हणजे 'काश्मीर फाईल्स'चीच पुनरावृत्ती असल्याची टीका शिरसाट यांनी केली आहे. आरोपीला आश्रय देणे आणि यंत्रणेला आव्हान देणे, यामागे नेमके कोणाचे हात आहेत? पाहा शिरसाट यांनी पत्रकार परिषदेत केलेले धक्कादायक खुलासे...

निदा खान प्रकरणात आता मोठा ट्विस्ट समोर आला आहे. एमआयएमच्या नगरसेवकाला या प्रकरणात सहआरोपी करण्यात आल्यानंतर शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे मंत्री संजय शिरसाट यांनी आता नवा आरोप केला आहे. एमआयएमचे नेते आणि माजी खासदार इम्तियाज जलील हे निदा खानला नाशिकला जाऊन भेटले होते, असा धक्कादायक आरोप संजय शिरसाट यांनी केल्याने राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. या संपूर्ण प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करण्याची मागणीही शिरसाट यांनी केली आहे. पत्रकार परिषद घेऊन शिरसाट यांनी हे धक्कादायक खुलासे केले आहेत. निदा खान प्रकरणात ज्या नवा घटना घडत आहेत, ती माहिती समोर येत असून अत्यंत धक्कादायक आहे.

निदाला तिथे कुणी पाठवलं याचा खुलासा झाला पाहिजे. निदा मुंब्र्याला का गेली नाही? ती एमआयएमच्या संपर्कात होती. इम्तियाज जलील तिला नाशिकला जाऊन भेटले होते. इम्तियाज जलील यांनीच तिला घर देण्यासाठी नगरसेवकाला भाग पाडलं, असा आरोप संजय शिरसाट यांनी केला आहे. धर्मांतर करणं, लव्ह जिहाद करणं, नशेखोर बनवणं अशा तीन स्टेजवर ही यंत्रणा काम करत आहे. हा गंभीर प्रकार आहे. याला राजकीय वळण देऊ नका, असंही त्यांनी म्हटलं आहे. निदा खानचा नगरशी काहीच संबंध नाही. तरीही ती नगरमध्ये दीड महिना राहते. एक म्हातारा बाहेर यायचा. कोणी बाहेर पडायचे नाही. ज्या नगरसेवकाचं हे घर आहे तो एमआयएमचा आहे. इम्तियाज जलील यांनीच नगरसेवकाला तिला घर द्यायला मजबूर केलं. जलील यांची कालची पत्रकार परिषदेतील देहबोली पाहा. कोणतीही केस बघा. पाहिले आरोपीला पकडले जाते आणि नंतर चौकशी वगैरे केली जाते. त्या कामात सुद्धा अडथळा आणला, असं ते म्हणाले.

काश्मीर फाईल प्रमाणेच…

आरोपीला फरार करणे आणि पुन्हा छातीठोकपणे चार्जशीट आहे का? हे विचारणे हे जाणून बुजून केले जात आहे. अनेक ठिकाणी निदा खान प्रकरण घडत आहे. काश्मीर फाईल प्रमाणे हे घडत आहे, याकडे गांभीर्याने पहिले पाहिजे, असंही त्यांनी सांगितलं.

एसआयटी चौकशी करा

छत्रपती संभाजीनगर येथे नुकत्याच घडलेल्या निदा खान अटक प्रकरणामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणाची विशेष तपास पथक (SIT) मार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. या प्रकरणातील आरोपांचा समाजमाध्यमांवर आणि जनसामान्यांमध्ये होत असून, विशेषत: एमआयएम पक्षाशी संबंधित काही व्यक्ती आणि नगरसेवक मतीन पटेल तसेच माजी खासदार इम्तियाज जलील यांची नावे समोर येत असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे या प्रकरणाची निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी होणे आवश्यक असल्याचे शिरसाट यांनी म्हटले आहे. संजय शिरसाट यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात संपूर्ण घटनेचा सखोल तपास एसआयटीमार्फत करण्यात यावा, संबंधित दोषींवर कठोर कारवाई करावी आणि जनतेमध्ये निर्माण झालेला संभ्रम दूर करावा, अशी मागणी केली आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group