नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी):-बहुचर्चित टीसीएस कंपनीतील 'कॉर्पोरेट जिहाद' आणि सक्तीच्या धर्मांतरण प्रकरणातील संशयित आरोपी निदा खानसह अन्य दोघांच्या जामीन अर्जावर आता येत्या १९ जून रोजी सुनावणी होणार आहे. नाशिकरोड अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश केदार जोशी यांच्यासमोर शुक्रवारी याप्रकरणी सुनावणी पार पडली. त्यात न्यायालयाने आरोपींच्या वकिलांची बाजू ऐकून घेतली असून, आता १९ जून रोजी सरकारी पक्षाची बाजू ऐकल्यानंतर या जामीन अर्जावर अंतिम निकाल दिला जाणार आहे. यापूर्वी देखील दोन वेळा या जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली होती. त्यामुळे आता १९ जूनच्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या प्रकरणात संशयित आरोपी दानिश एजाज शेख याच्या वतीने अॅड. फैज वसीफ यांनी न्यायालयात बाजू मांडली. वकिलांनी सांगितले की, "आम्ही दानिश शेख याच्या वतीने कोर्टात हजर झालो होतो. या सुनावणीदरम्यान सरकारी वकील, फिर्यादीचे वकील आणि आम्ही संयुक्त युक्तिवाद केला. कोर्टासमोर आम्ही अनेक कायदेशीर मुद्दे उपस्थित केले आहेत. दानिश याला अटक केल्यानंतर आधी त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती आणि त्यानंतर त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली. दानिश याचा अर्ज पहिल्यांदाच केला असून तो आधी फेटाळण्यात आला होता." आता यावर पुढील सुनावणी १९ तारखेला होईल. निदा खान हिच्या वतीने ॲड. राहुल कासलीवाल यांनी युक्तिवाद केला.
मैत्रीच्या प्रकरणाला धार्मिक रंग दिला गेला - माजी आमदार आसिफ शेख
टीसीएस मधील या बहुचर्चित प्रकरणात एमआयएमनंतर आता मालेगावमधील इस्लाम पार्टीची एंट्री झाली आहे. शुक्रवारी झालेल्या सुनावणीनंतर इस्लाम पार्टीचे नेते व माजी आमदार आसिफ शेखयांनी प्रसार माध्यमांशी बोलताना नाशिकमध्ये जे टीसीएस प्रकरण घडले, त्याला जाणीवपूर्वक धार्मिक रूप देण्याचा प्रयत्न काही जातीवादी लोकांनी केला आहे. वास्तविक पाहता, त्या ठिकाणी सर्व जण एकत्र काम करत होते आणि त्यांच्यात केवळ मैत्री होती. या प्रक्रियेत संशयित दानिश शेख याचे कुटुंबीय प्रचंड घाबरलेल्या अवस्थेत आमच्याकडे आले होते. आम्ही त्यांना कायदेशीर मदत म्हणून वकील मिळवून दिला असून ते सध्या काम पाहत आहेत. माझ्या घराची कागदपत्रे सर्व व्यवस्थित आहेत. जर या प्रकरणाला असाच धार्मिक रंग दिला जात असेल, तर राजकारणी म्हणून आम्ही मदत करत आलो आहोत आणि पुढेही करत राहू. ही कायदेशीर लढाई नाशिक कोर्टातून अगदी सुप्रीम कोर्टापर्यंत जरी गेली, तरी आम्ही आणि 'इस्लाम पार्टी' त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील," अशी प्रतिक्रिया माजी आमदार आसिफ शेख यांनी दिली.