नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी):- नाशिकमधील बहुचर्चित टीसीएस धर्मांतर प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी निदा खान हिच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे.
गेल्या महिनाभरापासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या निदाला नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत छत्रपती संभाजीनगरातून ताब्यात घेतले होते. शुक्रवारी तिला नाशिकरोड न्यायालयात हजर केले असता, ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
असे राबवले 'ऑपरेशन नारेगाव'
अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर निदा खान फरार झाली होती. ती छत्रपती संभाजीनगरमधील नारेगाव भागात लपल्याची माहिती नाशिक पोलिसांच्या एसआयटीला मिळाली होती. नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी छत्रपती संभाजीनगरचे पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांच्याशी संपर्क साधून तातडीने हालचाली केल्या.
नारेगाव येथील स्थानिक नगरसेवक मतीन माजिद पटेल याने तिला आश्रय दिल्याचे तपासात समोर आले. साध्या वेशातील २० हून अधिक पोलीस कर्मचारी दोन दिवसांपासून या वसाहतीवर लक्ष ठेवून होते. अखेर विनाचिन्हांकित वाहनांचा वापर करून अत्यंत गोपनीयरीत्या निदाला ताब्यात घेण्यात आले.
डिजिटल पुराव्यांचे घबाड हाती लागणार?
निदा खान फरार असताना तिने नाशिक, भिवंडी, मुंब्रा आणि छत्रपती संभाजीनगर असा प्रवास केला. या काळात तिने तांत्रिक विश्लेषणापासून वाचण्याचा प्रयत्न केला, मात्र डिजिटल ट्रॅकिंगमुळे ती पोलिसांच्या जाळ्यात अडकली. निदाच्या मोबाईलमध्ये पीडित मुलीला धर्मांतरासाठी प्रवृत्त करणारे चिथावणीखोर व्हिडीओ असल्याची चर्चा आहे. या मोबाईलमधील डेटा 'रिकव्हर' केल्यास अनेक धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
न्यायालयात 'इन कॅमेरा' सुनावणी
प्रकरणाचे गांभीर्य आणि सुरक्षेचे कारण लक्षात घेता नाशिकरोड न्यायालयात 'इन कॅमेरा' सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात होता. सरकारी पक्षाच्या वतीने विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी पोलीस कोठडीची मागणी करत युक्तिवाद केला. तर निदा खानच्या वतीने ॲड. राहुल कासलीवाल व ॲड. बाबा सय्यद यांनी बाजू मांडली. निदा गर्भवती असल्याने त्या आधारावर जामिनाची मागणी करण्यात आली होती, मात्र न्यायालयाने ती अमान्य करत पोलीस कोठडी सुनावली.
आश्रय देणाऱ्यांची खैर नाही! "संशयित आरोपी निदा खानला आश्रय देणाऱ्या नगरसेवक मतीन पटेल यालाही या गुन्ह्यात आरोपी करण्यात आले आहे. कायदेशीर प्रक्रियेत अडथळा आणणाऱ्या आणि आरोपींना मदत करणाऱ्या प्रत्येकावर कडक कारवाई केली जाईल." असा इशारा पोलीसआयुक्त संदीप कर्णिक यांनी दिला.
लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार; धर्मांतरासाठी दबाव
पीडित तरुणी आणि संशयित आरोपी दानिश शेख याची ओळख २०२२ मध्ये कॉलेजमध्ये असताना झाली होती. दानिशने पीडितेला टीसीएस कंपनीत नोकरी लावण्याचे आमिष दिले. जुलै २०२२ मध्ये खंडोबा टेकडी परिसरात त्याने पीडितेशी गैरवर्तन केले आणि लग्नाचे वचन देऊन तिला विश्वासात घेतले. त्यानंतर ऑगस्ट २०२४ मध्ये त्र्यंबक रोडवरील एका रिसॉर्टवर नेऊन तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले.
पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, दानिश शेख, त्याचा मित्र तौसिफ अख्तर आणि निदा खान या तिघांनी संगनमत करून पीडितेला तिच्या धर्माबद्दल हीन दर्जाच्या गोष्टी सांगितल्या. धार्मिकदृष्टया आक्षेपार्ह विधाने करून पीडितेचे मन विचलित करण्याचा प्रयत्न या संशयितांनी केला. "आमचा धर्म कसा श्रेष्ठ आहे" असे सांगून तिला धर्मांतरासाठी सातत्याने प्रवृत्त केले जात होते.
विवाहित असल्याचे लपवून फसवणूक दरम्यान, फेब्रुवारी २०२६ मध्ये माहिरीन नावाच्या महिलेचा पीडितेला फोन आला. तेव्हा दानिश हा आधीच विवाहित असून त्याला दोन मुले असल्याचे समोर आले. पीडितेने जाब विचारला असता, दानिशने तिला लग्नाबाबत उडवाउडवीची उत्तरे दिली.
तसेच, तौसिफ अख्तर याने पीडितेच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याची धमकी देऊन ऑफिसच्या पॅन्ट्रीमध्ये तिचे लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्न केला. तपासादरम्यान या गुन्ह्यात ॲट्रासिटीचे कलम वाढवण्यात आले होते.