नाशिक: येथील आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) च्या युनिटमध्ये समोर आलेल्या कथित धर्मांतर आणि छळाच्या प्रकरणाने आता एक अतिशय धक्कादायक वळण घेतले आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकासमोर (SIT) अशा काही बाबी उघड झाल्या आहेत,
ज्या एखाद्या थ्रिलर चित्रपटाच्या कथेलाही मागे टाकतील अशा आहेत. एका कर्मचाऱ्याला आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी आरोपींनी रचलेला चक्रव्यूह आणि पोलिसांनी केलेला हायटेक तांत्रिक तपास आता सर्वांसमोर आला आहे.
या प्रकरणातील पीडित पुरुष कर्मचाऱ्याने पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार, या संपूर्ण रॅकेटची सुरुवात मैत्रीच्या जाळ्यात ओढून झाली. मुख्य आरोपींपैकी एक असलेल्या तौसीफ अत्तार याने आधी या पीडित कर्मचाऱ्याशी घनिष्ठ मैत्री वाढवली. त्यानंतर ईदच्या दिवशी त्याला आपल्या घरी आमंत्रित करून 'शीर खुरमा' खाऊ घातला.
हा गोड पदार्थ खाल्ल्यानंतर आपल्याला प्रचंड गुंगी आली आणि आपण शुद्ध हरपल्याचा दावा पीडिताने आपल्या पोलिसांकडील जबानीत केला आहे. या गुंगीच्या किंवा बेशुद्धीच्या अवस्थेचा गैरफायदा घेऊन आरोपींनी पीडित कर्मचाऱ्यावर काही धार्मिक गोष्टी आणि प्रथा लादल्याचा पोलिसांना दाट संशय आहे.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जेव्हा पोलिसांनी तांत्रिक पुराव्यांचा धागा पकडला, तेव्हा त्यांचा सामना 'फेस स्कॅन' आणि कडक डिजिटल सुरक्षेशी झाला. या प्रकरणातील मुख्य आरोपी दानिश शेख याच्या मोबाईल फोनमध्ये तपासासाठी अत्यंत महत्त्वाचा डेटा दडला होता. मात्र, त्याने आपल्या फोनमधील प्रत्येक गोपनीय फाईल आणि ॲप्लिकेशनला 'फेस आयडी' (Face ID) आणि गुंतागुंतीच्या पासवर्डचे कडेकोट कुलूप लावले होते.
सायबर तज्ज्ञांनाही थेट हा डेटा फोडणे अशक्य झाल्याने नाशिक पोलिसांनी थेट न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. न्यायालयाकडून विशेष परवानगी मिळवून आरोपीला थेट प्रादेशिक न्यायसहायक विज्ञान प्रयोगशाळेत (RFSL) नेण्यात आले. तिथे त्याचा प्रत्यक्ष चेहरा स्कॅन करून फोन अनलॉक करण्यात आला आणि डिजिटल पुरावे हस्तगत करण्यात पोलिसांना मोठे यश मिळाले.
तपासात पुढे असेही समोर आले की, या पीडित कर्मचाऱ्याला बळजबरीने धार्मिक टोपी परिधान करायला लावून त्याचे फोटो 'TCS Nashik' नावाच्या अधिकृत व्हॉट्सॲप ग्रुपवर व्हायरल करण्यात आले होते, जेणेकरून त्याचे मानसिक खच्चीकरण करता येईल.
दरम्यान, हे प्रकरण केवळ एका कर्मचाऱ्यापुरते मर्यादित नसून, कंपनीतील इतर अनेक महिला कर्मचाऱ्यांनीही वरिष्ठ सहकाऱ्यांकडून झालेल्या मानसिक आणि लैंगिक छळाच्या तक्रारी नोंदवल्या आहेत. या सर्व प्रकरणांची दखल घेत नाशिक पोलिसांनी गुन्हे दाखल करून अनेक संशयितांना जेरबंद केले आहे.
आतापर्यंत या प्रकरणात 7 आरोपींना अटक करण्यात आली असून एकूण 9 एफआयआर दाखल झाले आहेत. टीसीएस कंपनीने या सातही आरोपींना निलंबित केले आहे. मुंबई नाका पोलिसांनी तौसिफ अत्तार, दानिश शेख, शाहरुख कुरेशी आणि रझा मेमन या चार मुख्य आरोपींचा ताबा घेतला असून न्यायालयाने त्यांना 29 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.