'लिव्ह-इन'च्या नावाखाली 73 वर्षीय महिलेची 57 लाखांची फसवणूक
'लिव्ह-इन'च्या नावाखाली 73 वर्षीय महिलेची 57 लाखांची फसवणूक
img
Nandini khandare More
आजकाल गुन्हेगारीच्या प्रमाणात चिंताजजंक  वाढ झाली असून ऑनलाईन पद्धतीने अनेकांच्या सहज फसवणूक होत आहे. तसेच हल्ली ऑनलाईन डेटिंग ऍप मेट्रीमनी असे अनेक पद्धतीने भामटे हे फसवेगिरी करत असतात आता अशीच एक बातमी समोर आली आहे. 

मॅट्रिमोनियल संकेतस्थळावरओळख करून ज्येष्ठ महिलांशी मैत्री करायची आणि नंतर त्यांचा विश्वास संपादन करून लाखो रुपयांना गंडा घालायचा, असा धक्कादायक प्रकार डोंबिवलीत समोर आला आहे. येथील एका 73 वर्षीय वयोवृद्ध महिलेला लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचे आमिष दाखवून तब्बल 57 लाख रुपयांना लुटणाऱ्या एका सराईत भामट्याला डोंबिवलीतील विष्णूनगर पोलिसांनी अटक केली आहे. या मोठ्या आर्थिक फसवणुकीमुळे पीडित ज्येष्ठ महिलेवर चक्क वृद्धाश्रमात जाण्याची वेळ आली आहे.

अनुज संतोष तिवारी उर्फ अनुज सिंग उर्फ अनुज त्रिवेदी (रा. लखनऊ, उत्तर प्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. विष्णूनगर पोलिसांनी मोठ्या शिताफीने या आरोपीला दिल्लीतून बेड्या ठोकल्या आहेत. तपासादरम्यान या भामट्याने केवळ डोंबिवलीतच नाही, तर देशभरातील अनेक महिलांना अशाच पद्धतीने लाखो रुपयांचा गंडा घातल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

डोंबिवलीत राहणाऱ्या 73 वर्षीय महिलेची आणि आरोपी अनुज तिवारीची ओळख एका मॅट्रिमोनियल साईटवर झाली होती. आरोपीने आपण एकटेच असून सोबत राहू, असे सांगत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर त्याने महिलेचा विश्वास संपादन केला आणि वेगवेगळ्या अडचणी सांगून, भावनिक साद घालत तिच्याकडून हळूहळू तब्बल 57 लाख रुपये उकळले. संपूर्ण जमापुंजी गमावल्यामुळे या ज्येष्ठ महिलेची मोठी आर्थिक हानी झाली असून, त्यांच्यावर आता वृद्धाश्रमात राहण्याची वेळ ओढावली आहे. 

महिलेच्या तक्रारीनंतर विष्णूनगर पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपीचा माग काढत त्याला दिल्लीतून ताब्यात घेतले. सध्या आरोपी अनुज तिवारी हा न्यायालयीन कोठडीत आहे. त्याने उत्तर प्रदेश, दिल्ली आणि महाराष्ट्रासह देशभरात अशा किती महिलांना आपल्या जाळ्यात ओढून फसविले आहे, याचा सखोल तपास पोलीस करत आहेत. या आरोपीकडून फसवणूक झालेल्या इतर महिलांनीही न घाबरता पुढे येऊन तक्रार करावी, असे आवाहन विष्णूनगर पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group