नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी):- येथील जेलरोड परिसरातील महारुद्र कॉलनी, वसंत विहार (अरिंगळे चाळ) येथे सोमवारी सकाळी एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक घटना उघडकीस आली आहे. कौटुंबिक वादातून पतीने आपल्या पत्नीसह सात वर्षांच्या निष्पाप मुलाची धारदार चाकूने निर्घृण हत्या केली. या दुहेरी हत्याकांडानंतर पतीने स्वतःही विषारी औषध प्राशन करून जीवनयात्रा संपवण्याचा प्रयत्न केला. या खळबळजनक घटनेमुळे संपूर्ण नाशिकरोड परिसरात तीव्र खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण पसरले आहे.
या घटनेत अश्विनी किरण हजारे (वय ४३) आणि श्रेयश किरण हजारे (वय ७) या मायलेकांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर हत्या करणारा आरोपी पती किरण एकनाथ हजारे (वय ५४) याने विषारी औषध सेवन केले असून, त्याला पोलिसांनी तातडीने बिटको व त्यानंतर शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. सध्या त्याची प्रकृती स्थिर असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किरण हजारे आणि अश्विनी हजारे यांचा २०१७ मध्ये विवाह झाला होता. दोघांचेही हे दुसरे लग्न होते. किरण हा रुग्णालयांना ऑक्सिजन पुरवठा करणे तसेच सोलर प्लांट उभारणीची मार्केटिंग चे काम करत होता. गेल्या सात महिन्यांपासून हे कुटुंब वसंत विहार परिसरातील अरिंगळे चाळीत भाड्याने राहत होते. रविवारी रात्री हे सर्वजण सासुरवाडीला जेवायला गेले होते. तिथून आनंदाने परतल्यानंतर सोमवारी सकाळी अचानक असे काय घडले की किरणने हे टोकाचे पाऊल उचलले, याचे गूढ अद्याप कायम आहे. सकाळी घराचे दरवाजे न उघडल्याने हा सर्व प्रकार उघडकीस आला.
घटनेची माहिती मिळताच नाशिकरोड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. घरात प्रवेश केला असता अत्यंत भीषण दृश्य समोर होते. प्राथमिक पाहणीत अश्विनी हजारे यांच्या डोक्याच्या मागील बाजूस धारदार शस्त्राने गंभीर वार करण्यात आले होते, तर अवघ्या ७ वर्षांच्या श्रेयशच्या गळ्यावर नराधम बापाने चाकूने वार केले होते. अतिरक्तस्रावामुळे दोघांचाही अंथरुणावरच तडफडून मृत्यू झाला होता.
घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस उपायुक्त किशोर काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त अद्विता शिंदे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण कोरडे, प्रवीण सूर्यवंशी यांच्यासह गुन्हे शोध पथकाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवले आहेत.
हजारे दांपत्याच्या विवाहाला साधारण ९ वर्षे झाली होती. व्यावसायिक दृष्ट्या स्थिर असलेला किरण अचानक इतका हिंसक कसा झाला, याबाबत पोलीस सर्व अंगांनी तपास करत आहेत. आर्थिक विवंचना, कौटुंबिक वाद की इतर काही कारण? याचा शोध पोलीस घेत आहेत. आरोपी पती किरण हजारे सध्या रुग्णालयात उपचाराधीन असून, तो बोलण्याच्या स्थितीत आल्यानंतर त्याची कसून चौकशी केली जाईल, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.