नातवांना घरी आणलं म्हणून बापानं लेकालाच संपवलं ; नक्की असं काय घडलं ?
नातवांना घरी आणलं म्हणून बापानं लेकालाच संपवलं ; नक्की असं काय घडलं ?
img
Nandini khandare More

सध्या राज्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ होत आहे. अतिशय शुल्लक अशा कारणांवरून अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे घडत आहेत. दरम्यान आता शीच एक बाप-लेकाच्या नात्यालाच काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. 

सोमवारी सांगलीतील जुने खेडे येथे बाप आणि धाकट्या भावाने मिळून मोठ्याची हत्या केल्याचा प्रकार पुढे आला होता. आर्थिक देवघेव आणि कौटुंबिक वादातून ही घटना घडल्याचं सांगितलं जात होता. आता मृत कपिल पवार याच्या पत्नीनं याप्रकरणी पोलिसांत धाव घेतली असून हत्येचं खरं कारण पुढे आलं आहे.

मृत कपिल झाजम्या पवार (वय 35) याची पत्नी प्रीती पवार यांनी ईश्वरपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार मुले सुट्टीवरून घरी आणल्याच्या क्षुल्लक कारणावरून वाद झाला. याच वादातूनच वडील आणि भावाने मिळून कपिल पवार याचा कोयत्याने वार करून खून केला. याप्रकरणात मृताचे वडील झाजम्या पवार (वय 65) व भाऊ अजय उर्फ अझरूद्दीन पवार (वय 23) या दोघांना पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने 19 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

प्रीती यांनी दिलेल्या जबाबानुसार, त्या व त्यांचे पती, कपिल, चार मुले, सासू-सासरे, दीर असे एकत्र राहतात. कपिल काहीच काम करत नसल्याने सासरे व त्यांच्यात नेहमी वाद होत होते. तिन्ही मुले कोल्हापूरच्या शाहूवाडी तालुक्यातील भेडसगाव येथील आश्रम शाळेत शिकतात. उन्हाळी सुट्टीसाठी ते घरी आले होते.

सोमवारी शाळा सुरू होणार असल्याने पती-पत्नी मुलांना सोडण्यासाठी ईश्वरपूरला गेले होते. मात्र शिक्षकांनी गुरुवारी पाठवण्यास सांगितल्याने सायंकाळी पाच वाजता ते परत जुनेखेडला आले. त्यावेळी घराबाहेर सासरे, दीर व सासू बसले होते. सासूने रात्रीच्या जेवणासाठी चिकन आणले होते. 'मुलांना परत घरी का आणले', यावरून सासरे झाजम्या पवार यांनी कपिलला 'तुझी पोरं तू परत का घेऊन आलास', अशी विचारणा करून शिवीगाळ सुरू केला.

वाद वाढल्याने कपिलने सासऱ्यांच्या हातातील दगड हिसकावला. त्यावेळी सासऱ्याने ऊसतोडीचा कोयता कपिलच्या कानावर मारला. कपिलच्या मानेवर, डोक्यात, हातावर व पाठीवर सपासप वार केले. गंभीर जखमी झालेला कपिल जागीच कोसळला. कपिलला ईश्वरपूर येथील सरकारी दवाखान्यात नेले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.


इतर बातम्या
Join Whatsapp Group