गुन्हेगारीच्या प्रमाणात चिंताजनक वाढ झाली असून अतिशय शुल्लक अशा कारणावरून देखील मोठे आणि गंभीर गुन्हे घडत असल्याच्या घटना आजकाल समोर येत आहेत. दम्यान हल्ली उत्तरप्रदेशमधून अनेक गुन्ह्याच्या घटना सतत घडतच आहरेत. उत्तर प्रदेशातील फतेहपूर जिल्ह्यात 18 वर्षीय पुष्पा देवी हिच्या हत्येप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणात तिच्यासोबत जवळपास एक वर्ष लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या 42 वर्षीय गंगासागर याच्यावर हत्येचा आरोप करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीने हत्या केल्यानंतर पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी बेपत्ता झाल्याची कहाणी तयार केली होती. मात्र, सुमारे महिनाभरानंतर तरुणीची ओळख पटल्याने आणि तपासाला गती मिळाल्यानंतर संपूर्ण प्रकरण उघडकीस आले. हे प्रकरण थरियांव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील औरेई गावातील असून मृत तरुणीची ओळख पुष्पा देवी अशी झाली आहे. गंगासागरच्या पत्नीचे यापूर्वी निधन झाले होते. त्यानंतर त्याचा पुष्पासोबत संपर्क आला आणि दोघांमध्ये जवळीक वाढल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
दोघांनी कोर्ट मॅरेज केल्याची माहितीही समोर
पोलिसांच्या माहितीनुसार, गंगासागर आणि पुष्पा यांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला होता. दोघांनी कोर्ट मॅरेज केल्याची माहितीही समोर आली आहे. नोव्हेंबर महिन्यापासून ते राधानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भाड्याच्या खोलीत राहत होते. पुष्पाच्या कुटुंबीयांनी सांगितले की, ती जवळपास वर्षभर गंगासागरसोबत राहत होती. मात्र, काही काळापासून तिचा कुटुंबाशी कोणताही संपर्क होत नव्हता. मुलीशी संपर्क तुटल्यानंतर तिचे वडील महावीर लोधी यांनी अनर्थाची शक्यता व्यक्त केली. त्यांनी राधानगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करत मुलगी गंगासागरसोबत राहत होती, मात्र आता तिच्याशी संपर्क होत नसल्याचे सांगितले. तसेच गंगासागरने तिची हत्या करून मृतदेह लपवला असावा, अशी शंका त्यांनी व्यक्त केली.
तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. तपासादरम्यान गंगासागरची कसून चौकशी करण्यात आली. त्यावेळी त्याने तरुणीची हत्या केल्याची कबुली दिल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, हत्या केल्यानंतर आरोपीने मृतदेह तीन दिवस घरातच लपवून ठेवला. त्यानंतर आणखी तीन साथीदारांच्या मदतीने ट्रॅक्टरवर मृतदेह नेऊन रेल्वे ट्रॅकवर टाकण्यात आला. ही घटना अपघात किंवा आत्महत्या असल्याचा आभास निर्माण करून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप आहे. 29 जून रोजी रेल्वे ट्रॅकवर एका तरुणीचा मृतदेह सापडला होता. त्यावेळी ओळख पटू न शकल्याने पोलिसांनी तो बेवारस मानून अंत्यसंस्कार केले होते. मात्र, त्यानंतर मृतदेहाची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरूच होते.
दरम्यान, गावात पुष्पाच्या हत्येची चर्चा सुरू झाल्यानंतर तिच्या वडिलांना रेल्वे ट्रॅकवर सापडलेला मृतदेह आपल्या मुलीचाच असावा असा संशय आला. त्यांनी पुन्हा पोलिसांशी संपर्क साधत हत्या झाल्याची शक्यता व्यक्त केली. त्यानंतर पोलिसांनी तपास अधिक तीव्र केला आणि आरोपीच्या चौकशीत संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला. या प्रकरणात मुख्य आरोपी गंगासागरसह तिघांना अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयात हजर करून पुढील कारवाई सुरू आहे. घटनेत वापरण्यात आलेला ट्रॅक्टर आणि एक मोटारसायकलही पोलिसांनी जप्त केली आहे. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात सहभागी असलेला आणखी एक आरोपी अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे. फतेहपूरचे पोलीस अधीक्षक अभिमन्यु मांगलिक यांनी सांगितले की, तरुणीच्या वडिलांच्या तक्रारीनंतर तपास सुरू करण्यात आला होता. चौकशीदरम्यान मुख्य आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. फरार आरोपीला लवकरच अटक करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.