''या'' शहरात ATSची मोठी कारवाई ! एकाचवेळी 60 ठिकाणी धडाधड छापे, आयएसआय कनेक्शन आणि ...
''या'' शहरात ATSची मोठी कारवाई ! एकाचवेळी 60 ठिकाणी धडाधड छापे, आयएसआय कनेक्शन आणि ...
img
Nandini khandare More

महाराष्ट्र एटीएसने आता एक मोठी कारवाई केली असल्याची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) पुणे शहर, पुणे ग्रामीण आणि पिंपरी-चिंचवड परिसरात मोठी छापेमारी सुरू केली असून यापूर्वीही काही दिवसांपूर्वी राज्यातील विविध भागांत एटीएसने याच प्रकरणाशी संबंधित छापेमारी केली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा एटीएसने राज्यभर कारवाईची मोहीम तीव्र केली असून, पुणे जिल्ह्यातील ६० हून अधिक ठिकाणी एकाचवेळी छापेमारी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.

पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी आणि त्याच्या कथित आयएसआय (ISI) संपर्कांच्या अनुषंगाने ६० हून अधिक संशयित व्यक्तींवर एटीएसची  नजर असून, त्यांच्या घरांवर एकाचवेळी छापे टाकण्यात आले आहेत. प्राथमिक माहितीनुसार, आयएसआयकडून शहजाद भट्टीच्या माध्यमातून भारतातील काही तरुणांना देशविरोधी कारवायांसाठी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न होत असल्याचा एटीएसला संशय आहे. त्याच अनुषंगाने या संशयितांची चौकशी आणि पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे.

एटीएसच्या प्राथमिक तपासानुसार, शहजाद भट्टी आणि त्याच्या साथीदारांनी फेसबुक, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि व्हॉट्सअॅप यांसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करून तरुणांशी संपर्क साधण्याचा तसेच त्यांच्यावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचा संशय आहे. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, सोशल मीडियाच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या संपर्क जाळ्याचा आणि त्यामागील उद्देशाचा शोध एटीएसकडून घेतला जात आहे. तपासाच्या अनुषंगाने आणखी काही महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान चार दिवसापूर्वी देखील महाराष्ट्रात विविध ठिकाणी एटीएसने ही कारवाई केली होती.

बेरोजगार आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बळ तरुणांना सहज कमाई आणि अधिक पैशांचे आमिष दाखवून या नेटवर्कमध्ये ओढले जात असल्याचा संशय आहे. सुरक्षा यंत्रणांच्या मते, या व्यक्तींना स्लीपर सेल आणि स्थानिक एजंट म्हणून तयार करण्याची योजना असू शकते. गुप्त माहिती गोळा करणे, अंमली पदार्थांची तस्करी आणि अवैध शस्त्रपुरवठा यांसारख्या गंभीर प्रकरणांचाही तपास सुरू आहे.

शहजाद भट्टी हा पाकिस्तानातील लाहोरचा रहिवासी असून, दुबईतून डोगर गँग आणि इतर टोळ्यांशी संबंधित नेटवर्क चालवतो. तो सोशल मीडियावर भारतीय तरुणांना सहज ओढून कट्टरतावादी विचारसरणी आणि हेरगिरीकडे नेतो. गेल्या काही महिन्यांत भारतातील दहशतवादी भरती आणि गुप्तहेर प्रकरणांमध्ये त्याचं नाव वारंवार समोर आलं आहे. महाराष्ट्रातही काही तरुण त्याच्याशी संपर्कात असल्याची माहिती मिळाल्यानंतर एटीएसने हे नेटवर्क तोडण्यासाठी मोठी कारवाई केली. शहजाद भट्टीच्या उलटगणती आता सुरू झाली असून, त्याला भारतात पकडण्यासाठी प्रयत्न तीव्र झाले आहेत.

पाकिस्तानस्थित सोशल मीडिया व्यक्तिमत्त्व शहजाद भट्टी हा दहशतवादाशी संबंधित कारवाया आणि कट्टरतावादी नेटवर्कशी कथित संबंधांमुळे भारतीय सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर आला आहे. एकेकाळी ऑनलाइन कॉन्टेन्ट (content) निर्मितीच्या माध्यमातून सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग निर्माण करण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या भट्टीवर आता डिजिटल प्लॅटफॉर्म्सच्या माध्यमातून असुरक्षित तरुणांची भरती करण्याचा आणि त्यांना गुन्हेगारी व अतिरेकी नेटवर्कशी जोडण्याचा आरोप आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group