अलीकडे अपघातांचे प्रमाण वाढत चालले आहे. दर दिवशी अनेक अपघाताच्या घटना घडत असतात.दरम्यान आता अशीच काळजाचा ठोका चुकवणाऱ्या अपघाताची बातमी समोर आली आहे.
अजमेर येथे देवदर्शन आटोपून नाशिककडे परतीच्या प्रवासात असलेल्या भाविकांच्या कारला धुळे जिल्ह्यात अत्यंत भीषण अपघात झाला आहे. मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील शिरपूर फाट्याजवळ हा काळजाचा ठोका चुकवणारा अपघात घडला. या दुर्घटनेत कारमधील दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून, अन्य पाच जण गंभीररीत्या जखमी झाले आहेत. त्यांना जवळच्या रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक येथील एक कुटुंब इनोव्हा कारने अजमेरला देवदर्शनासाठी गेले होते. दर्शन घेऊन परतत असताना शिरपूर फाट्याजवळ भरधाव वेगात असलेल्या कारवरील चालकाचे अचानक नियंत्रण सुटले. अनियंत्रित झालेली ही कार वेगाच्या भरात थेट महामार्गावरील दुभाजक (डिव्हायडर) तोडून विरुद्ध दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवर घुसली आणि समोरून येणाऱ्या एका मालवाहू ट्रकला अत्यंत वेगाने जाऊन धडकली.
अपघाताचा आवाज ऐकून स्थानिक नागरिकांनी आणि महामार्ग पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी स्थानिक लोकांच्या मदतीने कारमध्ये अडकलेल्या जखमींना बाहेर काढत मदतकार्य राबवले. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू या अपघातातील सर्व जखमी प्रवाशांना तातडीने जवळच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.
देवदर्शनाहून आनंदाने घरी परतणाऱ्या नाशिकच्या या कुटुंबावर वाटेतच काळाने असा भयंकर घाला घातल्याने सर्वत्र तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या भीषण अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती, जी पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला करून पूर्ववत केली.