१६ जून २०२६
नाशिक (नाना खैरनार) : - भाविक अहिरे हिची १९ वर्षाआतील भारतीय संघात कर्णधारपदी निवड झाल्याने नाशिक जिल्हा व शहरात आनंदोत्सव साजरा केला जात आहे.
भारतीय महिला संघ श्रीलंका दौर्यावर जाणार आहे. तीन टी-२० सामन्यांची मालिका आणि त्यानंतर तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. दौर्यातील पहिला सामना २२ जून रोजी खेळवला जाणार आहे. हा दौरा ६ जुलैपर्यंत चालणार आहे. त्यासाठीच भाविकाची भारतीय कर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे. भाविका ही यष्टीरक्षक फलंदाज आहे.
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनतर्फे आयोजित सामने खेळण्यासाठी भाविका अनेक वेळेेस नाशिकला आली होती. त्याचबरोबर दोन ते तीन वषापूर्वी नाशिक येथे आयोजित इंडियन ऑईल्सतर्फे आयोजित स्पर्धेतही तिने उत्तम कामगिरी करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. त्याचवेळी भाविका ही पुढील सामन्यांमध्ये चमक दाखवेल, अशी भविष्यवाणी केली जात होती आणि आज ती खरी ठरली. भाविकाचे जन्मगाव हे सटाणा तालुक्यातील लखमापूर येथील आहे. मात्र क्रिकेटसाठी कर्मभूमी पुणेच ठरली. भाविकाचा जन्म सुशिक्षित आणि सर्वसाधारण कुटुंबात झाला. तिचे वडील मनोजकुमार अहिरे आणि आई पूनम अहिरे नोकरीनिमित्त नाशिक आणि त्यानंतर २०१३ पासून पुण्यात स्थलांतरित झाले. सध्या ती भोसरी (पुणे) येथे राहत असून, एस.पी. कॉलेजमध्ये वाणिज्य शाखेत शिक्षण घेत आहे. लखमापूरचे पोपटराव राजाराम अहिरे यांची भाविका ही नात आहे. भाविकाचे काका विजयकुमार संपत आहिरे हे आरटीओ ऑफि पेठङरोड येथे वास्तव्यास असून, ते एमएससीबी, अंबड येथे ऑफिसमध्ये कार्यरत आहे.
वडील मनोजकुमार यांना टेनिस क्रिकेटची आवड असल्याने त्यांनी भाविकामधील क्रिकेटचे गुण ओळखले आणि तिला वयाच्या दहाव्या वर्षी कासारवाडी येथील ओम साई क्रिकेट अॅकॅडमीत दाखल केले. तिथे प्रशिक्षक संजय हाडके यांच्या मार्गदर्शनाखाली तिने मुलांच्या संघात एकटी मुलगी म्हणून सराव करीत आपले कौशल्य तावून सुलाखून घेतले. कोरोनाच्या कठीण काळातही वडिलांच्या साथीने तिने आपला सराव सुरूच ठेवला होता. भाविकाने आपल्या वैविध्यपूर्ण फलंदाजीने आणि उत्कृष्ट यष्टिरक्षणाने निवड समितीला नेहमीच प्रभावित केले आहे. यात १५ वर्षांखालील संघ बडोद्याविरुद्ध ११३ धावाआणि पदार्पणाच्या सामन्यात मुंबईविरुद्ध १२९ धावा फटकावून ती चर्चेत आली. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने तिला प्रतिभावान महिला फलंदाज म्हणून गौरविले. १९ वर्षांखालील संघ मेघालयाविरुद्ध पदार्पणातच ११९ धावांची शतकी खेळी केली. चॅलेंजर ट्रॉफी व आशिया कप चॅलेंजर ट्रॉफीमध्ये नाबाद ८३ धावा करत तिने तिची निवड सार्थ ठरवली आणि डिसेंबर २०२४ मधील आशिया कप विजेत्या भारतीय संघात स्थान मिळविले. खेळातील सातत्यमुळे २०२३ पासून भाविकाची सलग तीन वेळा नॅशनल क्रिकेट अॅॅकॅडमी बंगलोर येथे उच्च क्रिकेट प्रशिक्षण शिबिरासाठी निवड करण्यात आली.
जानेवारी २०२५ मध्ये आयसीसी अंडर-१९ टी-२० वर्ल्ड कप जिंकणार्या भारतीय संघात भाविकाचा मोलाचा वाटा होता. या ऐतिहासिक कामगिरीसाठी जानेवारी २०२६ मध्ये बीसीसीआयने तिला "नमन अवॉर्ड’ ने सन्मानित केले. तसेच मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रोहित पवार यांच्या हस्ते तिचा विशेष गौरव करण्यात आला होता.
भाविका विषयी बोलताना तिचे वडील मनोजकुमार अहिरे म्हणाले की, भाविका तीन वर्षाची असतांनाच तिची क्रिकेटची आवड माझ्या लक्षात आली. ती चांगली खेळू शकते.हे माझ्या लक्षात आले. पुण्यातील प्रशिक्षिक संजय हडके यांच्याकडे तिने २०१७ पासून प्रशिक्षण घेतले. तिला यष्टीरक्षणाचे प्रशिक्षण देण्यात आले. केवळ महाराष्ट्रासाठी नाही तर ती देशासाठी खेळू शकते, असे हडके यांनी सांगितले होते. त्यानुसार तिच्याकडे आता संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सोपविण्यात आल्याचे अहिरे यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, भारतीय संघाच्या कर्णधारपदी निवड ह केवळ आमच्यासाठी किंवा लखमापूरसाठी नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे. तिच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ मालिकेत यशस्वी कामगिरी करेल, असा विश्वास भाविकाचे वडील मनोजकुमार संत अहिरे यांनी व्यक्त केला.
Copyright ©2026 Bhramar