श्रवण महिन्याच्या पार्श्वभूमीवर भीमाशंकर देवस्थानाने एक मोठा निर्णय घेतलं आहे. म्हणून श्रावणात भीमशकंर देवस्थानाला जाण्याचा विचार करत असलेल्या भाविकांसाठी ही अत्यंत महत्वाची बातमी आहे.
श्रीक्षेत्र भीमाशंकरमंदिर आता श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवसापासून भाविकांसाठी पूर्णवेळ खुले राहणार आहे. श्रावण महिन्यापासून मंदिर सकाळी ५ ते रात्री ९.३० वाजेपर्यंत दर्शनासाठी खुले ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन प्रशासनाने यात्रा नियोजनाला वेग दिला आहे. पुणे येथे जिल्हाधिकारी कार्यालयात श्रीक्षेत्र भीमाशंकर श्रावणी सोमवार यात्रा नियोजन बैठक झाली.
श्रीक्षेत्र भीमाशंकर परिसर विकास आराखड्यांतर्गत सभामंडप व पायरी मार्गाचे काम सुरू असल्याने यापूर्वी दर्शनाची वेळ सकाळी ७ ते ११ अशी मर्यादित करण्यात आली होती. सध्या हे काम बंद असून दर्शन व्यवस्था सुरळीत सुरू आहे. त्यामुळे श्रावणाच्या पहिल्या दिवसापासून मंदिर पूर्णवेळ खुले ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
पार्किंग ते मंदिर वाहतुकीचे नियोजन भीमाशंकर येथे श्रावणात होणारी गर्दी लक्षात घेऊन केवळ एसटी महामंडळावर अवलंबून न राहता आवश्यकतेनुसार अतिरिक्त वाहने उपलब्ध करून देण्याचे ठरले. वाहनतळापासून मंदिरापर्यंत भाविकांची वाहतूक करण्याचे नियोजन पोलिसांनी करावे. खासगी वाहनांकडून आकारण्यात येणारे शुल्क एसटीच्या दराप्रमाणेच ठेवण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली. भीमाशंकर येथे मंजूर असलेल्या पोलिस चौकीला पूर्णवेळ मनुष्यबळ देण्याची मागणी करण्यात आली.
वाहनतळावर एक पोलिस उपनिरीक्षक आणि मंदिर परिसरात एक पोलिस उपनिरीक्षक नियुक्त करण्याबाबतही नियोजन करण्यात आले. प्लास्टिकविरोधात कडक कारवाई भीमाशंकर परिसर प्लास्टिकमुक्त करण्यासाठी वन विभागाने कडक कारवाई करावी, तसेच प्लास्टिक वापराबाबतच्या नियमांची सक्तीने अंमलबजावणी करावी, असे निर्देश देण्यात आले. मंचर, राजगुरुनगर आणि नारायणगाव येथून श्रावण काळात जादा एसटी गाड्या सोडण्याबाबतही नियोजन करण्याचे ठरले. भीमाशंकरची बंद असलेली पाणी योजनाही तातडीने सुरू करण्याची मागणी करण्यात आली.
अभिषेक, व्हीआयपी दर्शनासाठी ऑनलाइन बुकिंग पैसे घेऊन दर्शन दिले जात असल्याच्या तक्रारी वारंवार येत असल्याने अभिषेक व व्हीआयपी दर्शनासाठी केवळ ऑनलाइन बुकिंगची व्यवस्था करावी, अशी सूचना बैठकीत करण्यात आली. त्यामुळे दर्शन व्यवस्थेत पारदर्शकता येण्यास मदत होणार आहे. तहसीलदारांकडे सदस्य सचिवपद भीमाशंकर मंदिर खेड तालुक्यात असल्याने देवस्थानच्या नियोजनासाठी खेडचे तहसीलदार सदस्य सचिव असावेत, अशी मागणी करण्यात आली. पूर्वी खेडचे तहसीलदार सदस्य सचिव होते; मात्र मध्यंतरी हा बदल करण्यात आला होता.
निवृत्त उपजिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती भीमाशंकर येथील विविध कामांचे प्रभावी नियोजन करण्यासाठी निवृत्त उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्याची कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्याची सूचना करण्यात आली. संबंधित अधिकाऱ्याचे मानधन देवस्थानकडून देण्यात येणार असून, या निर्णयाला देवस्थानच्या अध्यक्षांनी अनुमोदन देत पुढील कार्यवाही करण्याचे सांगितले.