BHMS-CCMP डॉक्टरांना महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये नोंदणी देण्याच्या हालचालींना वैद्यकीय क्षेत्रातून विरोध होत आहे. इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) आणि इतर संघटनांनी या निर्णयाबाबत चिंता व्यक्त करत, यामुळे आधुनिक वैद्यकशास्त्राच्या मानकांवर परिणाम होऊ शकतो, असा दावा केला आहे. सर्वोपचार पद्धतीतील वैज्ञानिक दृष्टिकोन, उपचारांची गुणवत्ता आणि रुग्णांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय धोकादायक ठरू शकतो, अशी भूमिका संघटनांनी मांडली आहे. या मागणीच्या निषेधार्थ डॉक्टरांनी एकदिवसीय संप पुकारला आहे.
यासंदर्भात संबंधित शासकीय विभाग आणि मंत्रालयाकडे अनेक वेळा निवेदने, पत्रव्यवहार आणि पत्रकार परिषदांद्वारे चिंता व्यक्त करण्यात आली आहे, तरीही वैद्यकीय क्षेत्रातील या चिंतेकडे पुरेसे लक्ष दिले गेलेले नाही, त्यामुळे मंगळवारी सकाळी सहा ते बुधवारी सकाळी सहा पर्यंत आयएमएने सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
सार्वजनिक आरोग्याच्या व्यापक हितासाठी आणि पुराव्यावर आधारित आधुनिक वैद्यकीय पद्धतींचे मानदंड जपण्यासाठी हा निषेध आंदोलन करण्याचा निर्णय घेत आहे, असं आयएमएकडून सांगण्यात आलं आहे. हा निषेध 4 ऑगस्ट रोजी सकाळी 6 वाजता सुरु झाला असून 5 ऑगस्ट रोजी सकाळी 6 वाजेपर्यंत चालेल. तसेच, जर नोंदणी प्रक्रिया सुरू झाली, तर हे सेवा बंद आंदोलन अनिश्चित काळासाठी सुरू ठेवण्यात येईल, असं सुद्धा पत्रकाद्वारे सांगितलं आहे
सांगायचं झालं तर, 3 ऑगस्टच्या शासन निर्णयानुसार (GR) एक वर्षाचा प्रमाणपत्र कोर्स पूर्ण केलेल्या होमियोपॅथी डॉक्टरांना ॲलोपॅथी (आधुनिक वैद्यकशास्त्र) प्रॅक्टिस करण्याची परवानगी देण्यात आली आहे. या निर्णयाच्या विरोधात डॉक्टरांनी एक दिवसाचा वैद्यकीय सेवा बहिष्कार जाहीर केला आहे. हा निर्णय मागे न घेतल्यास तातडीने आणीबाणी सेवा देखील बेमुदत बंद करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
MARD JJ हॉस्पिटलचे अध्यक्ष विनायक शाह यांनी सांगितल्यानुसार, आम्ही संपावर जात आहे, सेंट्रल मार्डसह राज्य भर संप असणार. पहिल्या टप्पायत अत्यावशक सेवा सुरू राहतील, पण पुढे ते ही बंद होतील. सुरुवातीचे 24 तासात OPD बंद राहणार. पण जर उत्तर आलं नाही तर अत्यावशक सेवा बंद करणार BHMS चे निर्णय अद्याप झालेले नाहीत.
शाह पुढे म्हणाले, ‘CCMP चे रजिस्ट्रेशन झालेलं नाही, अशात रजिस्ट्रेशनचा मुद्दा त्याविरोधात आमचा संप आहे. जे निवासी डॉक्टर आहे त्याबाबत ही आम्ही अनेक मुद्दे मांडले आहेत, आमचा मुद्दा आहे की तुमचे शिक्षण ज्यामध्ये आहे त्यात प्रॅक्टिस करावी. आता हे असे करत आहे की होमोपॅथी मध्ये शिक्षण घेतले असले तरू पण पुढे अलोपथ्यीची प्रॅक्टिस करायची. त्यांनी एक कोर्स रजिस्ट्रेशन सुरू केला आहे आणि मिक्सोपॅथी सुरू करत आहे… असं म्हणत शाह यांनी विरोध केला.