अभिनेता राजपाल यादवचं चेक बाऊन्स प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. ‘अता पता लापता’ हा चित्रपट बनवण्यासाठी राजपाल यादवने बँकेकडून कर्ज घेतलं होतं. कर्जाची परतफेड न केल्यामुळे बँकेनं गहाण ठेवलेल्या मालमत्तेचा ताबा घेतला असून लिलाव प्रक्रिया सुरू केली आहे. ‘एक शहरात आणि दुसरी गावात असून त्यात एक शेतजमीन आणि एका घराचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा लिलाव 9 सप्टेंबर रोजी ऑनलाइन होणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील शाहजहानपूर इथल्या त्याच्या दोन मालमत्तांचा लिलाव येत्या 9 सप्टेंबर रोजी होणार आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडिया, मुंबईने शहरातील आणि गावातील या दोन मालमत्तांच्या लिलावासंदर्भात सूचना प्रसिद्ध केल्या आहेत. राजपाल यादववर सेंट्रल बँक ऑफ इंडिया, मुंबईचे 16.61 कोटी रुपये थकीत आहेत. तर राजपालच्या दोन मालमत्तांचं मूल्य अंदाजे 19.26 कोटी रुपये आहे
राजपालने कर्जासाठी जामीनदार म्हणून पत्नी राधा यादव आणि त्याची आई गोदावरी यादव यांच्या मालमत्ता गहाण ठेवल्या होत्या. याच्या आधारावर बँकेनं त्या मालमत्तांवर कारवाई सुरू केली आहे. शहाजहानपूर व्यतिरिक्त मुंबईतील त्याच्या इतर मालमत्तांचा लिलाव करण्याची प्रक्रियाही सुरू आहे. राजपाल यादवविरोधात चेक बाऊन्सचा खटला दाखल करणाऱ्या कंपनीचा मालकसुद्धा शाहजहानपूर इथलाच आहे. या प्रकरणामुळे राजपाल फक्त कायदेशीरच नाही तर आर्थिक समस्यांचाही सामना करत आहे. त्याच्या मालमत्तेवर लिलावाची नोटीस लावल्यापासून चर्चा आणखी तीव्र झाल्या आहेत. कर्ज वसूल करण्यासाठी नियमांनुसार ही कारवाई केली जात असल्याचं बँकेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे.
राजपाल यादवने सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या मुंबई शाखेतून 16.61 कोटी रुपयांचं कर्ज पत्नी राधा यादव आणि आई गोदावरी यादव यांच्या नावावर घेतलं होतं. परंतु तो वेळेवर या कर्जाची परतफेड करू शकला नाही. दोन वर्षांपूर्वी बँकेने यासंदर्भात एक नोटीस लावली होती. आता पुन्हा एकदा बँक प्रशासनाकडून त्याच्या मालमत्तेवर कर्ज वसुलीसाठी जप्तीची नोटीस चिकटवण्यात आली आहे.