गेल्या अनेक दिवसांपासून पती पत्नी यांच्या वादातून होणाऱ्या गंभीर घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत. पती पत्नीचे वाद, अनैतिक संबंध , अंतर्गत मतभेद अशा कारणांवरूनखुना सारखे गंभीर घटना घडत आहेत. दरम्यान आता अशीच एक घटना उघडकीस आली आहे.
वाशीम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील शिवनगर येथे अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. भारतीय लष्कारीतील एका जवानाने आपल्या सात महिन्यांच्या गरोदर पत्नीची हत्या केल्याचा आरोप समोर आला असून या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी कारंजा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय लष्कराच्या 6 व्या मराठा बटालियनमध्ये कार्यरत असलेल्या 28 वर्षीय ज्ञानेश्वर मदने याने आपल्या पत्नीची घरातच हत्या केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी जवानासह त्याच्या आई वडिलांना अटक केली आहे.
दरम्यान पीडित महिलेच्या भावाने दिलेल्या माहितीनुसार, आरोपी जवानाने काल दुपारी सुमारे 3 वाजता फोन करून बहीण घरात पडल्यामुळे तिला रुग्णालयात दाखल केल्याचे सांगितले होते. मात्र संशय आल्याने कुटुंबीय तात्काळ मध्यप्रदेशातील बऱ्हाणपूर जिल्ह्यातून सायंकाळी 7 वाजता कारंजा येथे दाखल झाले. पीडितेचा भाऊ राहुल माने यांनी गंभीर आरोप करत सांगितले की, आरोपी जवानाचे अनैतिक संबंध होते आणि याच कारणावरून तो त्यांच्या बहिणीचा सातत्याने छळ करत होता.
काही महिन्यांपूर्वी या प्रकरणी दोन्ही कुटुंबांमध्ये बैठक घेऊन सामंजस्याने तोडगा काढण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, तरीही छळ सुरूच असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. विशेष म्हणजे, मृत दीपाली सात महिन्यांची गरोदर होती, अशी माहितीही कुटुंबीयांनी दिली आहे. या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त केला जात असून पोलिस पुढील तपास करत आहेत.