सोने खरीद दारांसाठी एक खुशखबर आहे . आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. यामुळे बाजारात खरेदीदारांसाठी मोठी संधी निर्माण झाली आहे. आज सोन्याच्या दरात प्रतिदहा ग्रॅम एक हजार रुपये, तर चांदीच्या दरात प्रतिकिलो तीन हजार रुपयांची कपात झाली आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात होत असलेल्या बदलांचा थेट परिणाम सोन्या-चांदीच्या बाजारावर होत आहे. यामुळे सुवर्ण बाजारात सातत्याने चढ-उतार सुरूच आहेत. गेल्या आठवड्यातही अशीच परिस्थिती पाहायला मिळाली होती. मात्र, शेवटच्या तीन दिवसांत दरात वाढ झाल्यानंतर १९ सप्टेंबर रोजी दर पुन्हा कमी झाले होते.
दरम्यान, आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने व चांदीचे दर पुन्हा घसरले असून सोने हजाराने, तर चांदी तीन हजार रुपयांनी स्वस्त झाली आहे.
शनिवारी (१९ सप्टेंबर) सोन्याचा भाव १ लाख ५३ हजार रुपये (प्रतिदहा ग्रॅम, विना जीएसटी) होता. त्यात आज (२१ सप्टेंबर) एक हजार रुपयांची घसरण होऊन सोने १ लाख ५२ हजार रुपयांवर आले आहे. तर चांदी तीन हजार रुपयांनी स्वस्त झाली असून, चांदीचे भाव २ लाख ४१ हजार रुपयांवरून (प्रतिकिलो, विना जीएसटी) थेट २ लाख ३८ हजार रुपयांवर आले आहेत.