गेल्या अनेक दिवसांपासून देशभरात रुग्णालयात भीषण आगीच्या अनेक घटना घडल्या असून आता आणखी एका भीषण अग्नितांडवाची घटना घडली आहे. मुंबईतील जोगेश्वरी पश्चिमेकडील मालिका रुग्णालयाच्या टेरेस फ्लोअरवर रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास गॅस गळतीनंतर अचानक आग लागल्याची घटना घडली. रात्री सुमारे २.१५ वाजता घडलेल्या या प्रकारामुळे रुग्णालय परिसरात काही काळ मोठी खळबळ उडाली. या दुर्घटनेत रुग्णालयातील दोन कर्मचारी गंभीररीत्या भाजले असून, त्यांच्यावर सध्या दुसऱ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, टेरेसवर गॅस सिलिंडर ठेवण्यात आला होता. गॅस गळती झाल्यानंतर सिलिंडर पेटल्याने आगीचा भडका उडाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, आग नेमकी कशामुळे लागली आणि त्यानंतर सिलिंडरचा स्फोट कशामुळे झाला, याचे अधिकृत कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या वेळी रुग्णालयातील काही कर्मचारी टेरेसवर गप्पा मारत बसले होते. त्यापैकी एका कर्मचाऱ्याला सर्वांसाठी चहा बनवायला सांगितले. चहा करण्यासाठी गॅस पेटवण्याचा प्रयत्न करताच अचानक मोठा आगीचा भडका उडाला. या आगीत तेथे उपस्थित असलेले दोन कर्मचारी गंभीररीत्या भाजले.
घटनेनंतर दोन्ही जखमी कर्मचाऱ्यांना सुरुवातीला मालिका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, भाजण्याचे प्रमाण गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी अन्य रुग्णालयात हलवण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी त्यांच्या नातेवाईकांचे जबाबही नोंदवले आहेत. मात्र, नातेवाईकांकडून रुग्णालय प्रशासनाविरोधात कोणतीही तक्रार करण्यात आलेली नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह संबंधित अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. परिसराची पाहणी करून आगीचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे.दरम्यान, या प्रकरणी अद्याप कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही.