मराठा आरक्षणासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून मनोज जरांगे पाटील यांनी काल म्हणजेच, 15 सप्टेंबर रोजी अंतरवाली सराटीमधून मुंबईच्या दिशेनं प्रस्थान केलं आहे. मंगळवारी त्यांचा मुक्काम बीड जिल्ह्यातल्या पाटोदा येथे होता. आज त्यांच्या उपोषणाचा 19 वा दिवस असून आज त्यांचा मुक्काम श्रीगोंदा येथे असणार आहे. मात्र मुंबईच्या वाटेवर असतानाच आता पोलिसांनी मनोज जरांगे पाटील यांना नोटीस पाठवली आहे. जरांगे पाटलांच्या वतीने उपोषणासाठी देण्यात आलेल्या तिसऱ्या अर्जानंतर मुंबई पोलिसांनी मनोज जरांगे पाटील यांना अधिकृत नोटीस बजावून आंदोलनाबाबतची सविस्तर माहिती तात्काळ सादर करण्यास कळवले आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण करण्याची घोषणा केली होती. त्या पार्श्वभूमीवर उपोषणाला परवानगी मिळवण्यासाठी त्यांनी आझाद मैदान पोलिसांकडे अर्ज केला होता. परंतु त्यांचा अर्ज फेटाळण्यात आला. त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा उपोषणाच्या परवानगीसाठी अर्ज केला मात्र दुसऱ्यांदा देखील पोलिसांनी त्यांच्या उपोषणाला परवानगी नाकारली, दरम्यान त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी तिसऱ्यांना अर्ज केला. जरांगे पाटलांच्या वतीने उपोषणासाठी देण्यात आलेल्या तिसऱ्या अर्जानंतर आता मुंबई पोलिसांनी मनोज जरांगे पाटील यांना अधिकृत नोटीस बजावून आंदोलनाबाबतची सविस्तर माहिती तात्काळ सादर करण्यास कळवले आहे.
आंदोलनात सहभागी होणाऱ्या व्यक्तींची संख्या, वाहनांचा तपशील आणि स्वयंसेवकांची यादी कार्यालयाला देण्यास सांगण्यात आले आहे. माध्यमांसमोर केलेल्या “परवानगी नाकारली तर कोट्यवधी मराठे मुंबईत येणार” या वक्तव्यातील विरोधाभासावर पोलिसांनी या नोटीसच्या माध्यमातून स्पष्टीकरण मागितले आहे. परवानगी दिल्यानंतर आणखी आंदोलक मुंबईत येणार की कसे हे स्पष्ट करा, असं या नोटीसमध्ये पोलिसांनी म्हटलं आहे.
दरम्यान मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती आता खालावली आहे, त्यांनी आज दुपारी एक वजाता तातडीची पत्रकार परिषद बोलावली आहे. ते माध्यमांशी संवाद साधणार आहेत. मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावल्यामुळे वैद्यकीय पथकाकडून त्यांना उपचार घेण्याची विनंती करण्यात येत आहे. परंतु त्यांनी उपाचर घेण्यास नकार दिला आहे.