पाकिस्तानातून एक मोठी बातमी समोर येत आहे. पाकिस्तानमध्ये भीषण स्फोटाची घटना घडली. मशिदीमध्ये नमाज पठण करत असताना भयंकर स्फोट झाला. पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतातील कोहाटमध्ये शुक्रवारी नमाजच्या वेळी मशिदीजवळ झालेल्या भीषण स्फोटाने परिसर हादरला. जुन्या पोलीस लाइन्सजवळील मशिदीत हा स्फोट झाला.
या स्फोटामध्ये १५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. जुन्या पोलिस लाइन्सजवळ मशिदीमध्ये शुक्रवारच्या नमाजाच्या वेळी हा शक्तिशाली स्फोट झाला. या स्फोटात १५ जणांचा जागीच मृत्यू झाला तर ५० पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत.
पोलिसांच्या माहितीनुसार, हा स्फोट शुक्रवारच्या नमाज पठणाच्या वेळी झाला. या स्फोटामुळे मशिदीबाहेर एक मोठा खड्डा पडला. मशिदीच्या भिंती कोसळून मोठे नुकसान झाले. स्फोटकांनी भरलेल्या एका वाहन ओल्ड पोलिस लाइन्समध्ये घुसवण्यात आले. या वाहनाने धडक दिल्याने स्फोट झाला. त्यानंतर सशस्त्र अतिरेक्यांनी गोळीबार केला. या स्फोटामुळे जवळच्या इमारतींचेही नुकसान झाल्याचे वृत्त आहे.
रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या स्फोटामध्ये १५ जणांचा मृत्यू झाला. अनेकांच्या मृतदेहाचे तुकडे तुकडे झाले. मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. २५ जखमींना कोहाटच्या डीएचक्यू रुग्णालयात आणण्यात आले. या घटनेनंतर आणीबाणी जाहीर करण्यात आली. जखमींमध्ये पोलिसांचाही समावेश होता. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संपूर्ण परिसर सील केला. जखमींना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
पोलिस आणि सुरक्षा दलांनी ओल्ड पोलिस लाइन्सला घेराव घातला असून शोध आणि तपासणी मोहीम सुरू होती. कोहाट-हांगू रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. परिसरात अतिरिक्त सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे. पोलिस अधिकारी हा स्फोट कसा झाला आणि या स्फोटामागे कुणाचा हात आहे याचा शोध घेत आहेत. स्फोटानंतर गोळीबार झाल्याचेही वृत्त आहे.