महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाचे (एफडीएचे) आयुक्त तुकाराम मुंडे यांनी केंद्रीय अधिकाऱ्यांना रुग्णालयात सामान्यतः वापरल्या जाणाऱ्या वस्तूंच्या किमतींचा आढावा घेण्यास सांगितलं आहे. एका राज्यस्तरीय सर्वेक्षणात काही प्रकरणांमध्ये खरेदी किमतीपेक्षा तब्बल 2841 टक्क्यांपर्यंत वाढीव दर आकारले जात असल्याचं एफडीएला आढळून आहे.
महाराष्ट्रातील रुग्णालयांच्या पाहणीत असे दिसून आले आहे की, केवळ ११ रुपये खरेदी किंमत असलेल्या सलाईन नळीची छापील एमआरपी ३२५ रुपये आहे. याचा अर्थ त्यावर २८४१ टक्के एवढा वाढीव नफा लावला जात होता. या पाहणीत केवळ सलाईन नळीच नव्हे, तर इतर वैद्यकीय उपकरणांमध्येही प्रचंड दर वाढ झाल्याचे आढळले. ६ रुपये ७५ पैसे खरेदी असलेल्या सिरिंजवर ५७ रुपये २० पैसे, तर २९ रुपये ४१ पैशांना मिळणाऱ्या कॅथेटरची एमआरपी ३१० रुपये होती. औषध मूल्य नियंत्रण आदेशांतर्गत काही औषधांच्या किमतींवर मर्यादा आहेत.
मात्र, बहुतांश वैद्यकीय उपकरणे आणि साहित्यांवर अशा मर्यादा नसल्याने त्यांच्या किमती अनियंत्रित राहतात. या गंभीर निष्कर्षांनंतर, एफडीए आयुक्त तुकाराम मुंडे यांनी केंद्र सरकारच्या राष्ट्रीय औषध मूल्य निर्धारण प्राधिकरण (NPPA) आणि औषध विभागाला पत्र लिहिले आहे. त्यांनी खरेदी किंमत आणि जाहीर केलेली एमआरपी यांच्यातील मान्यताप्राप्त तफावतीबाबत स्पष्ट मार्गदर्शक तत्वे ठरवण्याची शिफारस केली आहे. हे रुग्णांना आर्थिक लुटीपासून वाचवण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल आहे.