राज्यात गेल्या नेक दिवसांपासून तुकाराम मुंढेंकडून मोठ्या कारवाई करण्यात येत असून भेसळयुक्त अन्नपदार्थ विकणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. FDA एक्शन मोड मध्ये असून आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात अन्न आणि औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. पुण्यातील बुधवार पेठ परिसरात करण्यात आलेल्या धडक कारवाईत पनीर आणि खव्याने भरलेले तब्बल चार ट्रक जप्त करण्यात आले आहेत. FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली अन्नपदार्थांच्या गुणवत्तेवर आणि संभाव्य भेसळीवर लक्ष ठेवण्यासाठी ही मोहीम राबवली जात आहे. सणासुदीच्या काळात मिठाई, दूधजन्य पदार्थ, पनीर, खवा आणि इतर खाद्यपदार्थांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. याच काळात भेसळयुक्त किंवा निकृष्ट दर्जाच्या पदार्थांचा पुरवठा होण्याची शक्यताही वाढते. त्यामुळे ग्राहकांच्या आरोग्याचा विचार करता FDA कडून बाजारपेठांमध्ये तपासणी आणि कारवाईला वेग देण्यात आला आहे.
बुधवार पेठेत FDA ची अचानक कारवाई
पुण्यातील बुधवार पेठ परिसरात FDA च्या पथकाने धडक कारवाई करत मोठ्या प्रमाणावर पनीर आणि खव्याचा साठा ताब्यात घेतला. या कारवाईसाठी मोठ्या संख्येने अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. चार ट्रकमध्ये असलेला हा साठा पाहता कारवाईचं गांभीर्य लक्षात येते. जप्त करण्यात आलेल्या खाद्यपदार्थांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. या नमुन्यांची प्रयोगशाळेत तपासणी झाल्यानंतर संबंधित पदार्थांची गुणवत्ता आणि ते अन्नसुरक्षा निकषांनुसार आहेत की नाही, याबाबत अधिक स्पष्टता मिळणार आहे.
सणासुदीत अन्नभेसळीवर FDA ची नजर
गणेशोत्सवात मोठ्या प्रमाणावर मिठाई आणि विविध खाद्यपदार्थांची विक्री होते. गणेशोत्सवाच्या आधीच FDA ने कारवाईला सुरुवात केल्याने अन्न व्यावसायिकांमध्येही सतर्कता वाढली आहे. विशेषतः पनीर, खवा, दूध, तूप, मिठाई यांसारख्या पदार्थांवर प्रशासनाकडून विशेष लक्ष दिलं जात आहे. दरम्यान, सण आणि धार्मिक कार्यक्रमांमध्ये वाटल्या जाणाऱ्या महाप्रसाद, भंडारा आणि सामूहिक अन्नवाटपाबाबतही FDA ने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. अशा कार्यक्रमांची पूर्वसूचना किमान सात दिवस आधी देण्याची सूचना करण्यात आली आहे. अन्न तयार करताना स्वच्छता, सुरक्षित पाणी, योग्य तापमान आणि अन्नसाठवणुकीचे नियम पाळणं आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केलं आहे.