मराठी चित्रपटसृष्टीच्या आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. आगामी 'ऑस्कर 2027 'साठी भारताकडून मराठी चित्रपट ‘गोंधळ’ची अधिकृत निवड करण्यात आली आहे. फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाने (FFI) याबाबतची घोषणा केली त्यामुळे मराठी चित्रपटसृष्टीसाठी अभिमानाची आणि आनंदाची बातमी आहे.
दिग्दर्शक संतोष डावखर यांच्या ‘गोंधळ’ या मराठी थ्रिलर चित्रपटाची 99व्या अकादमी पुरस्कारांसाठी म्हणजेच ऑस्कर २०२७ साठी भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून निवड करण्यात आली आहे. ‘बेस्ट इंटरनॅशनल फीचर फिल्म’ या श्रेणीत भारताचं प्रतिनिधित्व करण्यासाठी ‘गोंधळ’ची निवड झाली आहे. ‘फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया’ने (FFI) ही अधिकृत घोषणा केली आहे.
‘गोंधळ’च्या ऑस्कर प्रवेशामुळे मराठी सिनेसृष्टीचं नाव पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर पोहोचलं आहे. मराठी भाषेतील चित्रपटांना आशय, मांडणी आणि प्रयोगशीलतेसाठी देशभरातून यापूर्वीही दाद मिळाली आहे. आता ‘गोंधळ’च्या माध्यमातून मराठी चित्रपटाला जागतिक स्तरावर आपली ओळख निर्माण करण्याची संधी मिळणार आहे.
‘गोंधळ’ची ऑस्करसाठी निवड
फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाकडून दरवर्षी ऑस्करच्या आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म श्रेणीसाठी भारताकडून एका चित्रपटाची निवड केली जाते. यंदा या निवडीसाठी विविध भारतीय चित्रपटांमधून ‘गोंधळ’ची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे दिग्दर्शक संतोष डावखर आणि संपूर्ण चित्रपटाच्या टीमसाठी हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
‘कांतारा’ आणि ‘दशावतार’ यांसारख्या स्थानिक संस्कृतीवर आधारित चित्रपटांप्रमाणेच ‘गोंधळ’ही महाराष्ट्राच्या मातीत रुजलेला चित्रपट आहे. कर्नाटकाच्या 20 टक्के प्रदेशात ‘कांतारा’मधील परंपरा पाळली जाते, तर कोकणात ‘दशावतार’ला मोठं स्थान आहे. मात्र ‘गोंधळ’ ही परंपरा महाराष्ट्रातील तब्बल 80 टक्के भागात साजरी केली जाते, ही या चित्रपटाची मोठी ताकद आहे.
वरा–नवरीच्या आयुष्यातील विघ्नं दूर करण्यासाठी साजऱ्या होणाऱ्या ‘गोंधळ’ या पारंपरिक विधीच्या पार्श्वभूमीवर उभी राहाणारी कथा केवळ धार्मिक विधीपुरती मर्यादित न राहाता अंधश्रद्धा, कुटुंबातील नात्यांचे संघर्ष, समाजात बदलणारे दृष्टिकोन आणि माणसांच्या मनात दडलेला रहस्याचा धागा यांचाही वेध घेते. भव्य सादरीकरण, प्रभावी सिनेमॅटोग्राफी आणि तांत्रिक दृष्टीने उत्तम बांधणी यामुळे ‘गोंधळ’ मराठी संस्कृतीचं मूळ जागतिक प्रेक्षकांसमोर ताकदीने सादर करणारा ठरतोय.
चित्रपटात किशोर कदम, इशिता देशमुख, योगेश सोहोनी, निषाद भोईर, अनुज प्रभू, सुरेश विश्वकर्मा, माधवी जुवेकर, ऐश्वर्या शिंदे, कैलाश वाघमारे, प्रभाकर मठपती, विठ्ठल काळे, प्रवीण डाळींबकर, शरद जाधव, पूनम पाटील, प्रशांत देशपांडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.