''या'' शहरात FDA कडून तब्बल १६ आस्थापनांचे परवाने निलंबित
''या'' शहरात FDA कडून तब्बल १६ आस्थापनांचे परवाने निलंबित
img
Nandini khandare More
गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात FDA कडून धडक कारवाईचे सत्र सुरु असून भेसळयुक्त पदार्थ विकणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या ‘सेफ फूड, सेफ ड्रग, सेफ महाराष्ट्र’ या मोहिमेअंतर्गत पुण्यात ११ ते १४ ऑगस्टदरम्यान ही कारवाई करण्यात आली. तपासणीदरम्यान गंभीर त्रुटी आढळलेल्या १६ आस्थापनांचे परवाने तात्काळ निलंबित करण्यात आली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, तपासणीमध्ये अनेक ठिकाणी अस्वच्छता, अन्न हाताळणीतील त्रुटी तसेच अन्न सुरक्षा मानकांचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आले. हॉटेल व रेस्टॉरंट विभागात फॉर्च्यून एंटरप्रायझेस (हॉटेल सयाजी), लोणावळा; हॉटेल चूल मटण, लोहेगाव; सिम्पली साऊथ, भोसरी; हॉटेल पवन, कोल्हापूर; राजेश चायनीज, सांगली; जेबीएम हॉस्पिटॅलिटी (कॅन्टीन), वानवडी; बर्गर किंग, कॅम्प, पुणे; डॉमिनोज पिझ्झा, मलकापूर, कराड आणि पिझ्झा हट, कराड यांच्यावर कारवाई करण्यात आली. 

यापैकी जेबीएम हॉस्पिटॅलिटी (कॅन्टीन) ही आस्थापना आवश्यक परवान्याविना सुरू असल्याचे आढळले. त्यामुळे संबंधित व्यवसाय तात्काळ बंद करण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत. ई-कॉमर्स क्षेत्रातही प्रशासनाने तपासणीची धडक मोहीम राबवली. झेप्टो लिमिटेड, लोहेगाव; स्विन्स्टा ईएनटी प्रायव्हेट लिमिटेड, वारजे; तसेच ब्लिंक कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या नर्‍हे आणि टिंबर मार्केट येथील आस्थापनांवर कारवाई करण्यात आली. 

दरम्यान, शाळांच्या परिसरातील खाद्यपदार्थांच्या विक्रीवरही प्रशासनाचे लक्ष आहे. शाळांच्या ५० मीटर परिसरात एचएफएसएस (हाय फॅट, शुगर अँड सॉल्ट) पदार्थांची विक्री करणाऱ्या व्यावसायिकांवर सोमवारपासून कारवाई सुरू करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि सकस अन्न उपलब्ध व्हावे, यासाठी ही मोहीम राबविण्यात येत आहे. अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांविरोधात यापुढेही तपासणी व कारवाई सुरूच राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group