धानोरा तालुक्यात असलेल्या जपतलाई येथील आश्रमशाळेतील सहा विद्यार्थिनींना सर्पदंश झाल्याची घटना दोन दिवसांपूर्वी (10 ऑगस्ट) घडली. धक्कादायक बाब म्हणजे, विद्यार्थीनी साखरझोपेत असताना ही घटना घडली आणि सर्पदंशाने तीन विद्यार्थींनींचा मृत्यू झाला आहे, तर इतर मुलींवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, या घटनेनंतर आश्रमशाळेतील विद्यार्थीनींच्या सुरक्षिततेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. दरम्यान आता या प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे.
तीन निष्पाप विद्यार्थिनीच्या आश्रमशाळा प्रशासनावर गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी कारवाईचा धडाका लावला आहे. चौकशी अहवालात आश्रमशाळा प्रशासनाचा निष्काळजीपणा समोर आला होता. त्यानंतर पोलिसांनी मुख्याध्यापक आणि अधीक्षकांना अटक केली आहे. या प्रकरणी 5 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, गडचिरोली जिल्ह्यातील सामूहिक सर्पदंश घटने संदर्भात पोलिसांनी शाळेच्या मुख्याध्यापकासह अधीक्षकाला अटक केली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यात जपतलाई येथील खाजगी अनुदानित आश्रम शाळेत सामूहिक सर्पदंशाच्या घटनेत तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाला होता. तर काही विद्यार्थिनी जखमी झाल्याने त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या संदर्भात बुधवारी धानोरा पोलीस ठाण्यात मध्यरात्री पाच जणांवर विविध कलमाने गुन्हे नोंदवण्यात आले होते. त्या संदर्भात शाळेतल्या कर्मचाऱ्यांचे विधान बुधवारी संध्याकाळी उशिरापर्यंत पोलिसांनी घेतले. त्यानंतर गुरुवारी मुख्याध्यापक प्रशांत ताटपल्लीवार आणि अधीक्षक भोयर या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.