370 रुपयांच्या बिर्याणीच ''ते'' प्रकरण !  अश्लील टिप्पणीमुळे तरुणाचा गेला जॉब, अन..
370 रुपयांच्या बिर्याणीच ''ते'' प्रकरण ! अश्लील टिप्पणीमुळे तरुणाचा गेला जॉब, अन..
img
Nandini khandare More


सध्या सोशल मीडिया वर 370 रुपयांच्या बिर्याणीच  प्रकरण खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. दरम्यान आता या प्रकरणात एक माहिती समोर आली असून चक्क आता या बिर्याणी प्रकरणात अश्लील टिप्पणी करणाऱ्या तरुणाला त्याचा जॉब गमवावा लागला आहे. तर नक्की हे प्रकरण काय आहे आणि ते इतक का गाजलं हे जाणून घेऊ. 

स्टँड-अप कॉमेडियन प्रणीत मोरे याच्या लाइव्ह शोदरम्यान मजेमजेत केलेल्या एका अश्लील टिप्पणीमुळे तो तरूण वादात सापजला. एवढंच नव्हे तर या कॉमेंटचा आता त्याच्या करिअरवरही गंभीर परिणाम झाला आहे. ” 370 रुपयांची बिर्याणी” संदर्भात त्या तरूणाने केलेली कमेंट सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली. तो व्हिडिओ व्हायरल होताच, महिलांविषयी अवमानकारक आणि असंस्कृत मानसिकता दर्शवणारे उदाहरण म्हणत, लोकांनी त्याच्यावर कठोर शब्दांत टीका केली. अवघ्या काही तासांतच त्या तरुणाचे नाव, त्याची कंपनी आणि त्याचा व्यवसाय इंटरनेटवर ‘ट्रेंड’ होऊ लागलं.

बघता बघता ही परिस्थिती इतकी चिघळली की, तो तरूणा ज्या डिझाइन कंपनीत तो काम करत होता, त्यांनी एक जाहीर निवेदन प्रसिद्ध करत त्या तरूणाला कामावरूनच काढून टाकलं. ही घटना आता केवळ एका ‘व्हायरल व्हिडिओ’पुरती मर्यादित राहिलेली नसून सोशल मीडिया, सार्वजनिक वर्तन आणि कॉर्पोरेट प्रतिमा यांच्यातील संघर्षाची ‘केस स्टडी’ बनली आहे.

विशेष म्हणजे, या संपूर्ण वादामुळे केवळ संबंधित तरुणाबद्दलच नव्हे, तर कॉमेडी शोची संस्कृती आणि ‘व्हायरल’ कंटेंटची हाव यांबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. ‘लाईक्स’ आणि दाद मिळवण्याच्या नादात अनेकजण अशा लाइव्ह शो दरम्यान आपली मर्यादा ओलांडतात, असं अनेक युजर्सचं म्हणणं आहे. दुसरीकडे, सोशल मीडियावरील युजर्सनी कंपनीच्या या निर्णयाचे कौतुक केलं आहे. कामाच्या ठिकाणी महिलांचा आदर राखणे आणि कंपनीची प्रतिमा जपणे या दृष्टीने हे पाऊल उचलणे आवश्यक होते, असं त्यांचं म्हणणं आहे. 

काय आहे ‘370 रुपयांची बिर्याणीचा ’ वाद?

हा संपूर्ण वाद कॉमेडियन, स्टँड अप कलाकार, प्रणीत मोरेच्या ‘लाइव्ह स्टँड-अप शो’दरम्यान झाला. तो प्रेक्षकांशी संवाद साधत असताना, एका तरुणाने आपल्या ‘डेट’बद्दलचा एक किस्सा सांगितला. या संभाषणादरम्यान त्याने सांगितलं की, ‘डेट’साठी तो एका तरूणीसोबत गेला आणि त्याने तिथे चिकन बिर्याणीवर 370 रुपये खर्च केले. नंतर त्याला तो खर्च ‘वसूल’ करायचा होता. त्याचे हे बोलणं ऐकून शोमधील काही लोक हसताना दिसले, पण सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होताच लोकं चांगलेच संतापले.

त्या व्हिडिओवर हजारो कमेंट्सचा ओघ सुरू झाला.हे बोलणं म्हणजे ‘महिलांचा अपमान’ आहे असं म्हणत युजर्सनी या वक्तव्याचा निषेध केला आणि त्या तरुणाच्या मानसिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. अशा प्रकारची मानसिकता समाजातील महिलांच्या सुरक्षिततेसाठी आणि प्रतिष्ठेसाठी धोकादायक आहे, असं अनेक महिला युजर्सनी लिहीलं. काहीच वेळात तो व्हिडिओ इन्स्टाग्राम, ‘एक्स’ (X) आणि यूट्यूबवर ट्रेंड होऊ लागला. लोकांनी त्या तरुणाची ओळख शोधण्याचा प्रयत्न सुरू केला आणि अखेरीस त्याचे व्यावसायिक प्रोफाईल शोधून काढण्यात त्यांना यश आलं.

संबंधित तरुण हरियाणातील गुरुग्राम येथील एका डिझाइन कंपनीत काम करत होता. पाहता पाहता हे प्रकरण कंपनीच्या मॅनेजमेंटपर्यंत पोहोचलं आणि त्यांनी अंतर्गत चर्चा केली. त्यानंतर कंपनीच्या मालकाने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला. आपण या मुद्द्याबाबत महिला कर्मचाऱ्यांशी चर्चा केल्याचं त्यांनी नमूद केलं. त्या तरुणाविरुद्ध यापूर्वी कोणतीही तक्रार नव्हती आणि तो एक कष्टाळू कर्मचारी होता, मात्र असं असलं तरीही व्हायरल झालेल्या व्हिडिओमधील विधान कंपनीची नीतिमत्ता आणि मूल्यांच्या विरोधात आहे, असं कंपनीच्या मालकाने सांगितलं.

त्यामुळे अशा प्रकारची विधाने कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतली जाणार नाहीत असं कंपनीने स्पष्ट केलं. आणि त्या तरुणाला त्वरित कामावरून काढून टाकण्याचे त्यांनी जाहीर केलं. कंपनीच्या या निर्णयाला सोशल मीडियावरून मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळाला. 

इतर बातम्या
Join Whatsapp Group