नाशिकमधील
नाशिकमधील "या" प्रसिद्ध सराफ व्यावसायिकाकडून बँकेच्या ३८ कोटी रूपयांचा अपहार
img
दैनिक भ्रमर

बँकेकडून कॅश क्रेडिट घेऊन सुरुवातीला त्याची परतफेड करून अधिकाऱ्यांचा विश्वास संपादित करत बँकेच्या ३८ कोटी रुपयांचा अपहार नाशिक मधील प्रसिद्ध सराफ व्यावसायिकाने केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी सराफ व्यावसायिक निलेश बाफना याला अटक केली असून, त्याला २६ जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, नाशिक मधील बाफना ज्वेलर्सचा संचालक आरोपी निलेश सुभाष बाफना याने सन १९९८ टीजेएसबी सहकारी बँकेकडून ९० लाख रुपयांचे कॅश क्रेडिट घेतले होते. आरोपीने ते वेळीच भरून अधिकाऱ्यांचा विश्वास संपादित केला. नंतर त्याने वाढीव रकमेची वेळोवेळी मागणी केली. ती रक्कम ४४ कोटी रुपयांपर्यंत पोहोचली. मार्च २०२५ पासून आरोपी बाफना याने कर्जाचे नियमित व्याज भरण्यात कसूर केली. त्यानंतर बँकेने आरोपी बाफणाला वेळोवेळी नोटीस पाठवल्या. मात्र, त्याने बँकेच्या अधिकाऱ्यांना उडवाउडवीची उत्तरे देऊन वेळ मारण्याचा प्रयत्न केला.

निलेश बाफना याने कर्जाची रक्कम वेळेत न भरल्याने बँकेने जमीनदार असलेल्या कांतीलाल बाफना यांना फोन केला. आमचा या लोन शी काहीच संबंध नसल्याचे त्यांनी सांगितले. बाफना यांचे खाते एनपीए मध्ये गेल्याने बँकेने मालमत्ता संपादन करण्याची कारवाई सुरु केली. १२ मी २०२६ रोजीच्या जिल्हा दंडाधिकारी यांच्या आदेशाची प्रत ३ जून २०२६ रोजी बाफना ज्वेलर्स यांच्या दुकानातील सर्व साहित्याचा प्रत्यक्ष ताबा घेण्याची नोटीस बजावली. मात्र कर्जदार निलेश बाफना याने दुकानाचा ताबा दिला नाही. म्हणून पोलिसांच्या मदतीने अखेर दुकानाचे शटर उचकटण्यात आले. त्याच्या मिळालेल्या हातून लक्षात आले की, आरोपी बाफना याने दुकानात प्रत्यक्षात २५ लाख १९ हजार २५० रुपयांचा माल असताना दुकानात ५९ कोटी ७ लाख २४ हजार ८४४ रुपयांचा माल असल्याचे खोटरे स्टेटमेंट बनवून ते खरे असल्याचे भासवून बँकेची ३८ कोटी रुपयांची फसवणूक केली.

याप्रकरणी बँकेचे मॅनेजर सुहास दंडवते यांच्या फिर्यादीवरून निलेश सुभाष बाफना, सुभाष लखीचंद बाफना, नम्रता निलेश बाफना, प्रभावती सुभाष बाफना, कांतीलाल लखीचंद बाफना, सरला पारसमल बाफना यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी निलेश बाफणाला अटक केली असून त्याला २६ जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group