नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी):-कौटुंबिक वादातून एका संतापलेल्या जावयाने भरदिवसा सासरच्या घरात धुमाकूळ घालत सासू आणि पत्नीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना तपोवन रोडवरील काठेनगर भागात घडली आहे. संशयित जावयाने घराचे चक्क दोन दरवाजे तोडून आत प्रवेश केला आणि सासू, पत्नी तसेच मेहुण्याला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात संशयित जावयाविरुद्ध गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काठेनगर येथील हरिओम अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या ५३ वर्षीय पीडित सासूने याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यांच्या ३० वर्षीय मुलीचा विवाह २०२४ मध्ये संशयित तुषार विष्णुपंत जाधव (वय ३२, रा. वनवैभव सोसायटी, शिवाजीनगर, नाशिक-पुणे हायवे) याच्यासोबत झाला होता. त्यांना ८ महिन्यांचे बाळ आहे. मात्र, पती-पत्नीमध्ये सतत होणाऱ्या घरगुती वादांमुळे पीडित पत्नी गेल्या ११ महिन्यांपासून तिच्या माहेरी आई आणि भाऊ (सिव्हिल हॉस्पिटलमधील कर्मचारी) यांच्यासोबत राहत होती.
२ जुलै रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास जावई तुषार जाधव हा सासरच्या घरी आला आणि ८ महिन्यांच्या बाळाला आपल्या घरी घेऊन गेला. त्यानंतर दीड तासाने तो पुन्हा बाळाला परत आणून देऊन निघून गेला. मात्र, खरा थरार सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडला.
सायंकाळी तुषार पुन्हा काठेनगर येथील सासरच्या घरी आला. त्याने घराचा मुख्य दरवाजा आणि दुसरा दरवाजा लाथा मारून तोडला आणि तो थेट घरात घुसला. घरात घुसताच त्याने सर्वांना शिवीगाळ करत पत्नीच्या हातातून ८ महिन्यांचे बाळ हिसकावण्याचा प्रयत्न केला.
कपडे फाडून विनयभंग, जीवे मारण्याची धमकी......
आई आणि भावाने या प्रकाराला विरोध केला असता, तुषारने मेहुण्याच्या पोटात लाथाबुक्क्यांनी गंभीर मारहाण केली. त्यानंतर आपल्या पत्नीला जमिनीवर खाली पाडून बेदम मारहाण करत तिचे कपडे फाडले. ५३ वर्षीय सासू या भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थी करायला गेल्या असता, नराधम जावयाने त्यांना अत्यंत अश्लील आणि घाणेरड्या भाषेत शिवीगाळ केली. त्यांना पाठीवर लाथ मारून खाली पाडले आणि गंभीर कृत्य करत त्यांचा विनयभंग केला. "तुम्हाला जिवंत सोडणार नाही, मेहुणा बाहेर कुठे दिसला तर संपवून टाकीन!" अशी धमकी देत संशयिताने परिसरात प्रचंड आरडाओरडा केला. या धक्कादायक प्रकारानंतर पीडित सासूने तात्काळ उपनगर पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. पीडित महिलेच्या फिर्यादीवरून संशयित जावई तुषार विष्णुपंत जाधव याच्याविरुद्ध मारहाण, विनयभंग आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली गांधीनगर पोलीस चौकीचे एएसआय बकाल करत आहेत.