दररोज हजरोंच्या संख्येने भाविक जेजुरीगडावर दर्शनासाठी जात असतात. अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या या जेजुरी देवस्थानाबाबत आता प्रशासनाकसून एक मोठा आणि महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपासून भंडारा खरेदी आणि पार्किंगवरून भाविक व स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये वारंवार वाद निर्माण होत होते. अनेक भाविकांनी सक्ती आणि गैरसोयीबाबत तक्रारी केल्या होत्या.याच पार्श्वभूमीवर आता पोलिसांनी थोडं पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे.
जेजुरीत येणाऱ्या भाविकांना भंडारा आणि पार्किंगसाठी सक्ती करणाऱ्या व्यापाऱ्यांना आता पोलिसांनी थेट इशारा दिला आहे. “भंडारा आमच्याकडूनच घ्या” अशी जबरदस्ती केली तर तो प्रकार खंडणीसारखा मानला जाईल, असे स्पष्ट शब्दांत जेजुरी पोलिसांनी सांगितले आहे.
या पार्श्वभूमीवर प्रशासन, पोलीस अधिकारी आणि ग्रामस्थांची संयुक्त बैठक घेण्यात आली. या बैठकीत पोलीस अधिकारी दीपक वाकचौरे यांनी व्यापाऱ्यांना स्पष्ट इशारा दिला. भाविकांना कोणत्याही प्रकारची जबरदस्ती किंवा त्रास सहन केला जाणार नाही, असे त्यांनी सांगितले.तसेच जेजुरीत येणाऱ्या भाविकांनी कोणत्याही सक्तीला बळी न पडता थेट पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.