दरोड्याच्या घटना या दरदिवशी वाढतच असून आता दौंड शहरातून अतिशय थरारक अशी घटना उघडकीस आली आहे.या घटनेंन संपूर्ण परिसरात एकच खळबळ निर्माण झाली आहे.
मंगळवारी 28 जुलै रोजी मध्यरात्रीची ती वेळ. संपूर्ण दौंड शहर गाढ झोपेत असताना कुंभार गल्लीतील एका घरात काळजाचा ठोका चुकवणारी हालचाल सुरू होते. घरात एकही पुरुष सदस्य नसताना, हातात तलवारी आणि धारदार कोयते घेतलेल्या तरुणांची टोळी अचानक दरवाजा तोडून आत घुसते. कपाटाची तोडफोड, एका महिलेला बेदम मारहाण आणि त्यानंतर थेट डोक्याला पिस्तूल लावून जे काही घडवून आणलं गेलं, त्याने संपूर्ण दौंड तालुक्यात खळबळ उडाली आहे. पोलिसांना या भयंकर कटाचा माग लागला असून ११ जणांच्या या टोळीने रचलेल्या थराराचा खुलासा आता समोर आला आहे.
कुंभार गल्ली परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास हा सशस्त्र हल्ला झाला. घरात घुसलेल्या दरोडेखोरांनी सुरुवातीला कपाटात ठेवलेले ५० हजार रुपये रोख आणि पीडित महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन जबरदस्तीने हिसकावून घेतली. दरोडा टाकल्यानंतर हे गुंड पसार होणार असे वाटत असतानाच, या गुन्हेगारांनी तिथून न हलण्याचं ठरवलं आणि या गुन्ह्याला एक अत्यंत भयंकर वळण मिळालं.
पैशांची लूट केल्यानंतर आरोपी नदीम शेख याने थेट पीडित महिलेच्या डोक्याला रिव्हॉल्व्हर लावली. कुटुंबाला जातिवाचक शिवीगाळ करत, त्याने त्या महिलेच्या मुलीला ओढत बाहेर नेण्यास सुरुवात केली. आईने आपल्या मुलीला वाचवण्यासाठी जीवाच्या आकांताने आरडाओरडा केला. मात्र हातातील शस्त्रांचा धाक दाखवत आरोपींनी त्या निष्पाप मुलीला बळजबरीने एका गाडीत कोंबले आणि अंधाराचा फायदा घेत तिचे अपहरण करून पळ काढला.
पोलिसांची मोठी कारवाई
या धक्कादायक घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी चक्र फिरवली. याप्रकरणी पोलिसांनी तात्काळ ११ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी अत्यंत वेगाने कारवाई करत यातील काही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. इरफान शेख, फैजल काझी, अश्पाक शेख आणि अरबाज शेख अशी त्यांची नावं आहेत.
मुख्य सूत्रधार नदीम शेख, आफताब शेख, बादशहा शेख, शफीक मुलाणी (रा. मळद) आणि इतर तीन अनोळखी इसम सध्या फरार असून, पोलीस त्यांच्या मागावर आहेत. भरवस्तीत पिस्तुलाचा धाक दाखवून झालेल्या या अपहरण प्रकरणाचा पुढील तपास पोलीस युद्धपातळीवर करत आहेत.