सर्व सामान्यांना परवडणारा सोपा आणि सोयीस्कर प्रवास म्हणजे रेल्वे प्रवास. अनेकजण लांब पल्ल्याचा प्रवास करण्यासाठी रेल्वेलाच पसंती देतात. म्हणूनच रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी एक महत्वाची अपडेट समोर आली आहे.
भारतीय रेल्वे प्रवाशांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. रेल्वे तिकीट बुक करतानाच अतिरिक्त सामानाची (Extra Luggage) ऑनलाइन बुकिंग आणि त्याचे शुल्क भरता येणार आहे. त्यामुळे स्टेशनवर जाऊन पार्सल कार्यालयात वेगळी प्रक्रिया करण्याची गरज राहणार नाही. तसेच अतिरिक्त शुल्क भरून हे सामान प्रवासी स्वतःसोबत डब्यात घेऊन प्रवास करू शकतील.
कोणाला मिळणार ही सुविधा?
ही सुविधा फक्त कन्फर्म तिकीट असलेल्या प्रवाशांसाठी उपलब्ध असेल. तसेच ज्या प्रवासी श्रेणींमध्ये अतिरिक्त शुल्क भरून जास्त सामान नेण्याची परवानगी आहे, त्यांनाच या सुविधेचा लाभ मिळेल.
या सुविधेचा लाभ घेऊ शकणाऱ्या प्रवासी श्रेणी:
1)एसी फर्स्ट क्लास (AC First Class)
2)एसी 2-टियर (AC 2-Tier)
3)फर्स्ट क्लास (First Class)
4)स्लीपर क्लास (Sleeper Class)
advertisement
5)सेकंड क्लास (Second Class)
AC 3-टियर आणि AC चेअर कार प्रवाशांना सुविधा नाही
AC 3-टियर आणि AC चेअर कार प्रवाशांना ही सुविधा मिळणार नाही. याचे कारण म्हणजे या दोन्ही श्रेणींमध्ये मोफत नेण्याची सामानाची मर्यादा आणि जास्तीत जास्त अनुमत मर्यादा समान आहे. त्यामुळे अतिरिक्त सामानासाठी स्वतंत्र बुकिंगची आवश्यकता नाही.
कोणत्या वर्गात किती सामान नेता येईल?
एसी फर्स्ट क्लास
मोफत सामान: 70 किलो
अतिरिक्त शुल्क भरून: कमाल 150 किलो
एसी 2-टियर आणि फर्स्ट क्लास
मोफत सामान: 50 किलो
अतिरिक्त शुल्क भरून: कमाल 100 किलो
स्लीपर क्लास
मोफत सामान: 40 किलो
अतिरिक्त शुल्क भरून: कमाल 80 किलो
सेकंड क्लास
मोफत सामान: 35 किलो
अतिरिक्त शुल्क भरून: कमाल 70 किलो
AC 3-टियर आणि AC चेअर कार
मोफत सामान: 40 किलो
कमाल मर्यादा: 40 किलो
या दोन्ही श्रेणींमध्ये मोफत आणि कमाल सामान मर्यादा समान असल्यामुळे अतिरिक्त सामान बुकिंगची सुविधा उपलब्ध राहणार नाही.
अतिरिक्त सामानासाठी शुल्क भरावे लागेल
रेल्वेने स्पष्ट केले आहे की, मोफत मर्यादेपेक्षा जास्त पण नियमानुसार निश्चित केलेल्या कमाल मर्यादेच्या आत सामान असल्यास अतिरिक्त सामान शुल्क (Extra Luggage Charges) भरावे लागेल.
सामानाच्या आकारावरही नियम
केवळ वजनच नव्हे, तर सामानाच्या आकारावरही रेल्वेने मर्यादा निश्चित केल्या आहेत. सामान्य प्रवासी डब्यांमध्ये खालील आकारापर्यंतचे सामान नेता येईल.
100 सेंटीमीटर × 60 सेंटीमीटर × 25 सेंटीमीटर: या आकारातील ट्रंक, सूटकेस किंवा बॉक्स प्रवासी डब्यात नेता येतील.
AC 3-टियर आणि AC चेअर कारसाठी वेगळी मर्यादा: या दोन्ही श्रेणींमध्ये सामानाचा कमाल आकार:
55 सेंटीमीटर × 45 सेंटीमीटर × 22.5 सेंटीमीटर
यापेक्षा मोठे सामान या डब्यांमध्ये नेण्यास परवानगी दिली जाणार नाही.
प्रवाशांना होणार मोठा फायदा
या नव्या सुविधेमुळे अतिरिक्त सामानासाठी स्टेशनवर पार्सल कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागणार नाहीत. तिकीट बुक करतानाच सामानाची नोंदणी आणि शुल्क भरल्याने संपूर्ण प्रक्रिया अधिक वेगवान, पारदर्शक आणि सोयीस्कर होणार आहे. विशेषतः लग्नसमारंभ, स्थलांतर किंवा मोठ्या सामानासह प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या निर्णयाचा मोठा फायदा होणार आहे.