पावसाळ्यात फिरायला गेलेल्या तरुणाला निसर्गाची भुरळ पडून सेल्फीच्या नाना स्वतःचा जीवाच गमवावा लागला आहे. ही दुर्दैवी घटना खोपोली येथील प्रसिद्ध केपी (KP) वॉटरफॉल येथे घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार (KP) वॉटरफॉल वरून परतताना एका 23 वर्षीय पर्यटकाचा सुमारे 40 ते 50 फूट खोल दरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अभिषेक कुशवाह (वय 23, रा. ठाणे) असे मृत तरुणाचे नाव आहे. रात्रभर चाललेल्या अथक शोधमोहिमेनंतर पहाटेच्या सुमारास त्याचा मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात यश आले आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी ठाण्याहून चार मित्र रायगड जिल्ह्यातील खोपोली जवळ असलेल्या 'केपी वॉटरफॉल' येथे पर्यटनासाठी आले होते. वॉटरफॉल परिसरात मनसोक्त फिरल्यानंतर आणि आनंद लुटल्यानंतर सायंकाळी सर्व मित्र माघारी परतत होते. परतण्याच्या मार्गावर असताना, अभिषेक कुशवाह या तरुणाला निसर्गरम्य वातावरणात सेल्फी बनवण्याचा मोह झाला. मात्र, पावसामुळे परिसरातील रस्ता अत्यंत निसरडा झाला होता. सेल्फी घेण्याच्या प्रयत्नात अभिषेकचा अचानक पाय घसरला आणि तो थेट 40 ते 50 फूट खोल दरीत कोसळला.
अभिषेक दरीत कोसळल्याचे पाहताच त्याच्यासोबत असलेल्या मित्रांनी तातडीने स्थानिक ग्रामस्थांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून खोपोली पोलीस आणि 'हेल्प फाउंडेशन'च्या मदत पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. दरीतील अंधार आणि मुसळधार पावसामुळे शोधकार्यात मोठा अडथळा निर्माण होत होता. मात्र, स्थानिक ग्रामस्थ आणि बचाव पथकाने रात्रभर शोधमोहीम राबवली. अखेर सोमवारी पहाटे 4 वाजेच्या सुमारास अभिषेकचा मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात यश आले.
दरम्यान, या दुर्दैवी घटनेनंतर संपूर्ण ठाणे आणि खोपोली परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पावसाळ्यात पर्यटनस्थळी जात असताना सुरक्षिततेला प्राधान्य देणे अत्यंत गरजेचे आहे. प्रशासनाच्या वतीने पर्यटकांना धोकादायक आणि निसरड्या ठिकाणी रिल्स अथवा सेल्फी काढण्याचा मोह टाळावा. केवळ एका फोटो किंवा व्हिडिओसाठी स्वतःचा जीव धोक्यात घालू नका आणि पर्यटनादरम्यान प्रशासनाने दिलेल्या सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करा, असे आवाहन केले आहे.