डॉक्टरांच्या हलगर्जीपणाचा धक्कादायक प्रकार; नवजात बाळ अडीच-तीन फूट उंचीवरून पडले
डॉक्टरांच्या हलगर्जीपणाचा धक्कादायक प्रकार; नवजात बाळ अडीच-तीन फूट उंचीवरून पडले
img
Nandini khandare More
अनेकदा डॉक्टरांच्या हलगर्जीपणामूळे मोठ्या आणि भीषण अशा घटना घडल्याचे अनेकदा समोर आले आहे. दरम्यान आता पुन्हा एकदा एक अतिशय संतापजनक घटना समोर आलाय आहे. 

विरार पश्चिमेकडील डॉ. जोगळेकर रुग्णालयात  वैद्यकीय हलगर्जीपणाचा एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. प्रसूतीच्या वेदना होत असताना रुग्णालयाच्या  दुर्लक्षामुळे एका 7 महिन्यांच्या गर्भवती महिलेचे नवजात बालक प्रसूतीदरम्यान थेट जमिनीवर पडले. या भीषण अपघातात बालक गंभीर जखमी झाले असून त्याच्यावर सध्या ठाणे  येथील एनआयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित सात महिन्यांची गर्भवती महिला बुधवारी तीव्र प्रसूती वेदना सुरू झाल्याने विरार पश्चिमेतील डॉ. जोगळेकर रुग्णालयात दाखल झाली होती. प्रसूतीची वेळ जवळ आल्याने तिने वारंवार तेथील डॉक्टर आणि परिचारिकांना "पोटातून बाळ बाहेर येत असल्याची जाणीव होत आहे," असे सांगितले. मात्र, रुग्णालय प्रशासनाने आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी तिच्या या गंभीर तक्रारीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

तक्रारींकडे दुर्लक्ष झाल्यामुळे महिला उभी असतानाच तिच्या गर्भाशयातून नवजात बालक थेट अडीच ते तीन फूट उंचीवरून कडक जमिनीवर कोसळले. या अपघातात बालकाच्या डोक्याला आणि शरीराला गंभीर दुखापत झाली. बाळाची प्रकृती वेगाने खालावल्याने त्याला तातडीने ठाणे येथील एनआयसीयूमध्ये हलवण्यात आले आहे. सध्या या चिमुकल्याची प्रकृती अत्यंत नाजूक असल्याचे वैद्यकीय सूत्रांकडून सांगितले जात आहे.

या घटनेनंतर संतप्त झालेल्या नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनाच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. निष्पाप जिवाशी खेळ करणाऱ्या जबाबदार डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. दरम्यान, या प्रकरणी रुग्णालयाचे प्रमुख डॉ. जोगळेकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी भेटणे आणि प्रतिक्रिया देणे टाळले. त्यामुळे वसई-विरार महापालिकेच्या आरोग्य विभागाने या प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group